धाराशिव: धाराशिव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेमींसाठी आणि अनुयायांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. शहरात अण्णाभाऊंचे भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून, या स्मारकासाठी शासकीय दूध संघाची जागा विनामूल्य देण्याच्या निर्णयावर राज्य मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले आहे.
कोट्यवधींची बचत आणि जागेचा प्रश्न निकाली
गेल्या अनेक वर्षांपासून धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा आणि स्मारक उभारण्याची मागणी होत होती. यापूर्वी महसूल विभागाने जागा देण्याचा निर्णय घेतला होता, परंतु त्याबदल्यात नगरपालिकेला २ कोटी ८ लाख रुपये बाजारभावाप्रमाणे शासनाला देणे बंधनकारक होते. पालिकेकडे निधी नसल्याने हा विषय रखडला होता.
मात्र, आ. कैलास पाटील यांनी शासनाकडे विशेष बाब म्हणून ही रक्कम माफ करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, राज्य शासनाने सर्व्हे क्रमांक ४२६ मधील १ एकर जमीन नगरपालिकेला विनामूल्य (मूल्यरहित व महसूलमुक्त) देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यामुळे नगरपालिकेचे दोन कोटी रुपये वाचले असून स्मारकाचे काम वेगाने सुरू होणार आहे.
स्मारकाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये
हे स्मारक केवळ पुतळ्यापुरते मर्यादित नसून ते भव्य आणि प्रेरणादायी स्वरूपात साकारले जाणार आहे. स्मारकामध्ये खालील बाबींचा समावेश असेल:
-
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा.
-
नागरिकांसाठी आकर्षक उद्यान.
-
विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका.
नगरविकास विभागाच्या माध्यमातून या कामासाठी यापूर्वीच १.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. जमीन ताब्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
या निर्णयामुळे धाराशिव शहरात आनंदाचे वातावरण असून, लवकरच शहराच्या वैभवात या ऐतिहासिक स्मारकाची भर पडणार आहे.






