धाराशिव: जिल्ह्यातील तुळजापूर येथे माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली आहे. येथील राजेश श्रीमंत पवार या दिव्यांग (मूकबधिर) व्यक्तीवर अमानुष अत्याचार करण्यात आला असून, गुन्हा दाखल होऊनही आरोपी मोकाट फिरत आहेत. या प्रकाराविरोधात ‘प्रहार दिव्यांग क्रांती संस्था’ आक्रमक झाली असून, आरोपींना तात्काळ अटक न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला आहे.
धक्कादायक वास्तव: एफआयआर असूनही आरोपी मोकाट
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २२ डिसेंबर २०२५ रोजी तुळजापूर येथे राजेश पवार या मूकबधिर तरुणाच्या असहायतेचा फायदा घेत त्याच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आला. या गंभीर प्रकरणाची तक्रार दाखल (FIR) झाली आहे. मात्र, पोलीस प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नाही. धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणातील आरोपी खुलेआम फिरत असून पीडित दिव्यांग व्यक्तीला धमकावण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे पीडित तरुणाच्या जीवितास धोका निर्माण झाला असून, पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची मागणी
दिव्यांग हक्क अधिनियम २०१६ आणि नुकताच झालेला १३ नोव्हेंबर २०२५ चा शासन निर्णय अस्तित्वात असतानाही दिव्यांगांवर असे अत्याचार होत असतील आणि कारवाई होत नसेल, तर हे कायद्याचे अपयश असल्याची टीका ‘प्रहार’ने केली आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने आज धाराशिव पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. दोषींना तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी आणि पीडित व्यक्तीला पोलीस संरक्षण द्यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
हे निवेदन प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष व मराठवाडा अध्यक्ष मयूर काकडे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी प्रशासनाला कडक शब्दात इशारा दिला. “दिव्यांग व्यक्तींवरील अन्याय कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. जर प्रशासनाने तात्काळ न्याय दिला नाही, तर प्रहारचा लढा रस्त्यावर उतरून अधिक तीव्र केला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी बाळासाहेब पाटील, महादेव चोपदार, महेश माळी, शाखाध्यक्ष कुमार नरवडे, अमोल पाडे, शशीकांत सोनवणे, मारुती कांबळे, कृष्णा राऊत यांच्यासह संघटनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.






