धाराशिव: नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीच्या निकालानंतर धाराशिव जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी ठाकरे गटाला दिलेल्या आव्हानानंतर आता युवा सेनेच्या राज्य उपसचिव मनीषा वाघमारे यांनी त्यांना सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. “तुझ्यात धमक असेल तर जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आई सोडून दुसऱ्या सर्वसाधारण महिलेचे नाव दे,” असे खुले आव्हान वाघमारे यांनी दिले आहे.
नेमका वाद काय?
नगर परिषद निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. यावरून मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना डिवचले होते. “आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरे गटाने आपला अध्यक्ष निवडून आणून दाखवावा, मी माझे नाव बदलेन,” असे चॅलेंज मल्हार पाटील यांनी दिले होते. इतकेच नाही तर ठाकरे गटाच्या ‘मशाल’ या निवडणूक चिन्हाची खिल्ली उडवताना त्यांनी मशालीला ‘आईस्क्रीमचा कोन’ म्हटले होते. या विधानावरून जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये संतापाचे वातावरण होते.
मनीषा वाघमारेंचा पलटवार
मल्हार पाटील यांच्या या टीकेला आता युवा सेनेच्या रणरागिणी मनीषा वाघमारे यांनी तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले आहे. मल्हार पाटील यांच्या आव्हानाचा समाचार घेताना त्या म्हणाल्या की, “मल्हार पाटील, तुमची हिंमत असेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी तुमच्या घरातील किंवा तुमच्या आईंचे नाव न देता, एखाद्या सर्वसाधारण घरातील महिलेला उमेदवारी देऊन तिला निवडून आणून दाखवा.”


वाघमारे यांच्या या वक्तव्यामुळे आता हा वाद केवळ राजकीय न राहता, घराणेशाही विरुद्ध सामान्य कार्यकर्ता असा रंगण्याची चिन्हे आहेत. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा ‘कलगीतुरा’ आणखी रंगणार असल्याचे दिसत आहे.






