तुळजापूर : तुळजापूर शहरातील जुन्या बसस्थानकासमोरील रसवंती गृहातून दोन मोबाईल चोरणाऱ्या चोरट्याला तुळजापूर पोलिसांनी अवघ्या काही तासांतच जेरबंद केले आहे. सुदर्शन अंकुश कदम (वय ३९, रा. माडवखेळ, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मारुती अभिमन्यु रसाळ (वय ५४, रा. वेताळ नगर, तुळजापूर) हे २५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जुन्या बसस्थानकासमोरील एका रसवंती गृहात थांबले होते. यावेळी अज्ञात चोरट्याने नजर चुकवून त्यांचे दोन मोबाईल फोन चोरून नेले. याप्रकरणी मारुती रसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर तुळजापूर पोलिसांनी वेगाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी सुदर्शन अंकुश कदम याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने हा गुन्हा केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला मुद्देमाल (मोबाईल) जप्त केला आहे. पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.






