धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीचे निकाल लागून आठवडा उलटला तरी भाजप आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातील राजकीय संघर्ष शमण्याची चिन्हे नाहीत. आता हा संघर्ष चक्क ‘हाबाडा’ या शब्दाच्या अर्थावरून पेटला असून, दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी वापरलेल्या ‘हाबाडा’ शब्दावरून भाजपने जाब विचारला असता, ठाकरे गटाने या शब्दाचा ऐतिहासिक आणि अस्सल गावरान अर्थ उलगडून भाजपला प्रतिआव्हान दिले आहे.
नेमका वाद काय?
नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीत धाराशिव जिल्ह्यात ठाकरे गटाला अपेक्षित यश मिळाले नाही. यावरून भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी ठाकरे गटाला डिवचले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाच्या मनिषा वाघमारे, श्वेता दुरुगकर आणि ॲड. संजय भोरे यांनी मल्हार पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.
यातच आता भाजपचे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष तथा नवनिर्वाचित नगराध्यक्ष नेहा काकडे यांचे पती राहुल काकडे यांनी उडी घेतली. लोकसभा निवडणुकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांना सव्वातीन लाखांचे मताधिक्य मिळाले होते. त्यावेळी ओमराजेंनी ” भाजप आमदार राणा पाटील यांना ‘हाबाडा’ दाखवला,” असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा संदर्भ पकडत राहुल काकडे यांनी, “हाबाडा म्हणजे नेमके काय? हे खासदार ओमराजेंनी सांगावे,” असा प्रश्न उपस्थित केला आहे.
‘हाबाडा’चा ऐतिहासिक संदर्भ: ठाकरे गटाचे प्रत्युत्तर
राहुल काकडे यांच्या प्रश्नाला युवा सेनेचे तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. सूर्यवंशी यांनी सांगितले की, “हाबाडा हा शब्द अस्सल गावरान मराठी असून तो बीडच्या मातीतून आला आहे. राजकारणात या शब्दाचा अर्थ विरोधकांचा अनपेक्षित पराभव, कुरघोडी किंवा बंडखोरी असा होतो. विरोधक जाणीवपूर्वक याचा चुकीचा अर्थ काढून खासदार ओमराजे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचत आहेत.”
शब्दाचा इतिहास आणि बाबूराव आडसकर
राकेश सूर्यवंशी यांनी या शब्दाचा रंजक इतिहासच मांडला. ते म्हणाले, “हा शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात बीडचे दिवंगत काँग्रेस नेते बाबूराव आडसकर यांची देण आहे. १९७२ च्या दुष्काळात आडसकर यांनी केज मतदारसंघात प्रचंड काम केले होते. १९७२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्यासमोर समाजवादी नेते बापूसाहेब काळदाते यांचे आव्हान होते. त्यावेळी आडसकर आपल्या भाषणात, ‘औंदा हाबाडा देणारच, विरोधकांचा टांगा पलटी करायचाच,’ असे गावरान शब्द वापरत. या निवडणुकीत आडसकर विजयी झाले आणि काळदातेंचा पराभव कसा झाला, असे विचारले असता त्यांनी ‘दिला हाबाडा’ असे उत्तर दिले होते. तेव्हापासून हा शब्द राजकारणात रूढ झाला असून खुद्द शरद पवार साहेब देखील याचा उल्लेख करतात.”
भाजपला प्रतिसवाल
राकेश सूर्यवंशी यांनी राहुल काकडे यांना प्रतिप्रश्न केला की, “हाबाडा हा शब्द जर विरोधकांना चितपट करण्यासाठी वापरला जाणारा एक राजकीय शब्दप्रयोग आहे, तर यात भाजपच्या लोकांना वावगे का वाटते? या शब्दात गैर काय आहे, हे आता राहुल काकडे यांनीच सांगावे.”
एकंदरीत, निवडणुकीचे मैदान शांत झाले असले तरी ‘हाबाडा’ शब्दावरून धाराशिवचे राजकारण पुन्हा एकदा तापले आहे.






