नाशिक/धाराशिव: शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नुकतीच महाराष्ट्रातील सर्वोच्च आणि ऐतिहासिक अशा साल्हेर किल्ल्यावर चढाई करून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. हिंदवी परिवार महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित हिवाळी मोहिमेअंतर्गत त्यांनी हा गड सर केला. विशेष म्हणजे, या मोहिमेदरम्यान गडावरच त्यांना ‘सह्याद्री भूषण’ या मानाच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.
सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून आणि अवघड वाटेवरून प्रवास करत खासदार निंबाळकर यांनी साल्हेरच्या माथ्यावर भगवा फडकवला. या अनुभवाबद्दल बोलताना ते म्हणाले की, “सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यांतून चालताना प्रत्येक पाऊल इतिहासाशी संवाद साधत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या गडावर उभे राहिल्यावर मन अभिमानाने भरून आले आणि स्वराज्याची जाणीव अधिक गडद झाली.” चढाईमुळे शारीरिक थकवा आला असला तरी, मनाचा उत्साह आकाशाला गवसणी घालणारा होता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
‘सह्याद्री भूषण’ पुरस्काराने सन्मान


या ऐतिहासिक मोहिमेचे औचित्य साधून साल्हेर गडावर एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसिद्ध शिवव्याख्याते आणि शिवचरित्रकार डॉ. शिवरत्न शेटे यांच्या हस्ते खासदार ओमराजे निंबाळकर यांना “सह्याद्री भूषण” पुरस्कार प्रदान करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारताना खासदार निंबाळकर म्हणाले, “हा सन्मान माझा वैयक्तिक नसून शिवविचार, सह्याद्री आणि इतिहासावर प्रेम करणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताचा आहे. हा पुरस्कार मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा असून, शिवरायांचा इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प अधिक दृढ करणारा आहे.”
साल्हेर: स्वराज्याच्या इतिहासाचे सर्वोच्च शिखर
या मोहिमेच्या निमित्ताने साल्हेर किल्ल्याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. साल्हेर हा महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची सुमारे १५६७ मीटर आहे. नाशिक जिल्ह्यातील बागलाण परिसरात साल्हेर-मुल्हेर ही डोंगररांग वसलेली आहे. १६७२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडावर मुघल सैन्याचा निर्णायक पराभव केला होता, ज्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
हिंदवी परिवार महाराष्ट्र यांनी आयोजित केलेल्या या मोहिमेत अनेक शिवभक्त सहभागी झाले होते. या अविस्मरणीय अनुभवासाठी खासदार ओमराजे यांनी आयोजकांचे आणि उपस्थित शिवभक्तांचे आभार मानले आहेत.






