धाराशिव: नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी आतापासूनच कंबर कसली आहे. मागील अनुभवातून धडा घेत पक्षाने आता ‘सावध’ पवित्रा घेतला असून, गटनिहाय बैठकांचा सपाटा लावत इच्छुकांची चाचपणी सुरू केली आहे.
याचाच भाग म्हणून आमदार कैलास पाटील यांनी धाराशिव आणि कळंब तालुक्यातील विविध गावांना भेटी देत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच बेंबळी (ता. धाराशिव) येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बेंबळी जिल्हा परिषद गटाची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.


कार्यकर्त्यांच्या निष्ठेची परीक्षा
या बैठकीत आमदार पाटील यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक स्थितीचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी कार्यकर्त्यांच्या अडचणी, स्थानिक प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी मार्गदर्शन करताना आमदार पाटील म्हणाले की, “ही निवडणूक केवळ उमेदवाराची नसून प्रत्येक कार्यकर्त्याच्या निष्ठेची, मेहनतीची आणि संघटनशक्तीची परीक्षा आहे. त्यामुळे उमेदवार कोणीही असो, त्याला निवडून आणण्याची जबाबदारी ही आपल्या सर्वांची आहे.”
स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवाराला पसंती
बेंबळी जिल्हा परिषद गटात जनतेच्या विश्वासावर निवडणूक जिंकण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पक्षाकडून सक्षम, स्वच्छ प्रतिमा असलेल्या आणि प्रत्यक्ष काम करणाऱ्या उमेदवारालाच संधी दिली जाईल, असे संकेत यावेळी देण्यात आले.
जनसंपर्क वाढवण्याचे आवाहन
कार्यकर्त्यांनी आतापासूनच आपला जनसंपर्क वाढवावा, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून विकासकामांचा लेखाजोखा मांडावा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांशी प्रामाणिकपणे जोडून घ्यावे, असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले.
या आढावा बैठकीला बेंबळी जिल्हा परिषद गटातील प्रमुख पदाधिकारी, निष्ठावंत शिवसैनिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्त्वाचे मुद्दे:
-
नगर परिषद निकालामुळे ठाकरे गट सावध.
-
आमदार कैलास पाटील यांच्याकडून थेट गावनिहाय बैठका.
-
उमेदवार कोन्हीही असो, निवडून आणण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार.
-
विकासकामे आणि जनसंपर्कावर भर देण्याच्या सूचना.
- ईटकुर , शिराढोण , खामसवाडी, येरमाळा येथे बैठकीत सकारात्मक सूर






