धाराशिव: नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात जाहीर करण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी ‘लातूर-कल्याण (जनकल्याण द्रुतगती मार्ग)’ या महामार्गाच्या नियोजित आराखड्यात तांत्रिक व व्यवहार्य बदल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. परांडा-भूम-वाशीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून हा मार्ग ‘बीड’ ऐवजी ‘कळंब-पारा-ईट’ मार्गे नेण्याची मागणी केली आहे. यामुळे प्रवासाचे अंतर तब्बल ६० ते ७० किलोमीटरने कमी होईल, असा दावा त्यांनी केला आहे.
नेमकी मागणी काय?
उपलब्ध माहितीनुसार, सध्या प्रस्तावित असलेला जनकल्याण द्रुतगती मार्ग हा ‘लातूर – अंबेजोगाई – केज – बीड – जामखेड – अहिल्यानगर – कल्याण’ असा आहे. मात्र, यात बदल करून हा मार्ग ‘लातूर – कळंब – पारा – ईट – खर्डा – जामखेड – अहिल्यानगर – कल्याण’ या मार्गाने वळवल्यास तो अधिक फायदेशीर ठरेल, असे राहुल मोटे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
शेतकऱ्यांना आणि धाराशिव जिल्ह्याला मोठा फायदा
राहुल मोटे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सुचवलेल्या नवीन मार्गामुळे केवळ प्रकल्पाचा खर्च आणि प्रवाशांचा वेळ वाचणार नाही, तर आकांक्षित जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धाराशिव जिल्ह्याला याचा थेट लाभ मिळेल. धाराशिव जिल्हा हा प्रामुख्याने कृषिप्रधान आहे. हा महामार्ग या भागातून गेल्यास येथील शेतकऱ्यांना आपला शेतमाल मुंबई आणि ठाणेसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये नेणे अत्यंत सुलभ होईल. यामुळे बाजारपेठेचा विस्तार होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.
दिग्गजांकडे मांडले गाऱ्हाणे
या मार्गाचा फेरविचार व्हावा, यासाठी राहुल मोटे यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन दिले आहे.
लातूर ते मुंबई हे अंतर १०-१२ तासांवरून ४-५ तासांत पूर्ण करण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. आता यावर केंद्रीय मंत्री आणि राज्य सरकार काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
-
सध्याचा मार्ग: लातूर-बीड-जामखेड-कल्याण
-
प्रस्तावित मार्ग: लातूर-कळंब-पारा-ईट-जामखेड-कल्याण
-
फायदा: अंतर ६०-७० किमीने घटणार, धाराशिवच्या शेतकऱ्यांना मुंबईची कनेक्टीव्हीटी मिळणार.







