धाराशिव: ऐतिहासिक वारसा ही आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे, पण हल्लीच्या काही ‘इंस्टाग्राम रील स्टार्स’ आणि तथाकथित ‘प्रेमवीरांनी’ धाराशिव लेण्यांची अक्षरशः वही करून टाकली होती. कुणी ‘पूजा’साठी, तर कुणी ‘विशाल’साठी लेण्यांच्या भिंतींवर बाण मारलेले हृदय आणि नावांची नक्षी काढली होती. पण, या विकृत प्रेमाला एक सणसणीत चपराक देत धाराशिवच्या सुपुत्रांनी एक आदर्श घालून दिला आहे.
प्रेमाची ‘भिंत’ नव्हे, इतिहासाचा ‘स्तंभ’!
धाराशिव लेणी हे एक पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण आहे. मात्र, काही रिकामटेकड्या पर्यटकांनी या जागतिक वारशाच्या भिंतींवर खडू आणि रंगाने आपली नावे लिहून विद्रुपीकरण केले होते. भिंतींवरची ती गिचमिड बघून इतिहासप्रेमींचे मन तीळतीळ तुटत होते.
विजय आणि विवेक यांची ‘लय भारी’ कामगिरी:


“फक्त फोटो काढणारे खूप आहेत, पण हाताला माती लावणारे कमी.” हेच सिद्ध केले आहे विजय राठोड आणि विवेक यादव या बहाद्दरांनी! सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यापेक्षा या तरुणांनी थेट हातात पाणी आणि ब्रश घेतला.
सकाळी ८ वाजता सुरू झालेली ही स्वच्छता मोहीम तब्बल संध्याकाळी ५ वाजेपर्यंत चालली. न थांबता, न थकता या दोघांनी आणि त्यांच्या मित्रांनी भिंतीवरची प्रेमिकांची नावे, ती हृदयांची नक्षी आणि अश्लील लोगो घासून-पुसून साफ केले. त्यांच्या या मेहनतीमुळे लेण्यांनी पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला आहे.
धाराशिवकरांना कळकळीची विनंती:
विजय राठोड आणि त्यांच्या टीमने आज जी मेहनत घेतली आहे, तिचा सन्मान राखा. लेण्या या आपल्या अस्मितेचा भाग आहेत, तुमच्या ‘लव्ह स्टोरी’चा फलक नाहीत. त्यामुळे कृपया तिथे जाऊन घाण करू नका आणि कुणी करत असेल तर त्याला तिथेच थांबवा.
आमचा एकच नारा – वारसा जपा, इतिहास घडवा!
https://www.facebook.com/reel/846887964643047






