धाराशिव: नियोजित लातूर-कल्याण म्हणजेच ‘जनकल्याण द्रुतगती मार्ग’ हा धाराशिव जिल्ह्याच्या विकासाचा कणा ठरणार आहे. हा मार्ग अधिक जलद आणि सोयीचा करण्यासाठी त्याची आखणी लातूर–कळंब–पारा–ईट–खर्डा–जामखेड–अहिल्यानगर–कल्याण अशा सुधारित मार्गाने करण्यात यावी, अशी आग्रही आणि ठोस मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात खासदार निंबाळकर यांनी केंद्रीय मंत्री गडकरी यांना सविस्तर निवेदन दिले असून, प्रस्तावित बदलांमुळे होणाऱ्या फायद्यांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
७० किमी अंतर वाचणार
सध्याच्या नियोजित आराखड्यापेक्षा खासदार निंबाळकर यांनी सुचवलेला कळंब-ईट-खर्डा हा सुधारित मार्ग अवलंबल्यास लातूर ते कल्याण प्रवासाचे एकूण अंतर अंदाजे ६० ते ७० किलोमीटरने कमी होणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ तर वाचेलच, शिवाय इंधनाचीही मोठी बचत होईल, असा दावा निंबाळकर यांनी केला आहे.
आकांक्षी जिल्ह्याला विकासाची संधी
केंद्र सरकारच्या ‘आकांक्षी जिल्हा’ (Aspirational District) योजनेत धाराशिवचा समावेश आहे. मात्र, जिल्ह्यात मोठ्या उद्योगांचा अभाव असल्याने बेरोजगारीची समस्या गंभीर आहे. जर हा द्रुतगती मार्ग कळंब, पारा, ईट या भागांतून गेला, तर या भागात दळणवळण सुधारेल आणि नवीन उद्योगधंद्यांना चालना मिळेल, असे खासदारांनी निवेदनात नमूद केले आहे.
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर
हा मार्ग प्रामुख्याने कृषी पट्ट्यातून जात आहे. त्यामुळे सुधारित मार्गामुळे कळंब आणि परिसरातील शेतकऱ्यांना आपला शेतीमाल मुंबई, ठाणे आणि कल्याणसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये अत्यंत जलदगतीने पोहोचवणे शक्य होईल. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होऊन जिल्ह्याचा कायापालट होऊ शकतो.
या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करून जनहितार्थ ‘जनकल्याण द्रुतगती मार्गा’च्या आराखड्यात तातडीने बदल करावा, अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लावून धरली आहे.






