तुळजापूर: येथे दुकान का सुरू केले आणि एका विशिष्ट व्यक्तीला कामावर का ठेवले, या क्षुल्लक कारणावरून एका तरुणावर साखळी, पाईप आणि हातोडीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाना उत्तम कोकडे (वय ४०, रा. धाराशिव रोड, तुळजापूर) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिंदफळ (ता. तुळजापूर) येथील चार जणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास तुळजापूर येथील बापू कणे यांच्या घरासमोर असलेल्या दुकानापाशी घडली. फिर्यादी नाना कोकडे हे आपल्या दुकानावर असताना आरोपी बालाजी सुभाष शिंदे, राहुल बळीराम शिंदे, दत्ता महादेव शिंदे आणि धनश्री सुभाष शिंदे (सर्व रा. सिंदफळ) तिथे आले.
आरोपींनी कोकडे यांना, “तू येथे दुकान का टाकले?” आणि “गणेश घाटशिळे याला कामावर का ठेवले?” असा जाब विचारला. यावरून वाद घालत आरोपींनी कोकडे यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी साखळी, पाईप आणि हातोडीने जबर मारहाण केली. या हल्ल्यात नाना कोकडे गंभीर जखमी झाले आहेत.
उपचारानंतर नाना कोकडे यांनी २७ डिसेंबर रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ (जीवे मारण्याचा प्रयत्न) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस करत आहेत.






