धाराशिव: जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, उमरगा आणि लोहारा येथे दोन घरफोड्या तर येरमाळा येथे महामार्गावर कंटेनरमधून टायर चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी एकूण पावणे तीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
१. उमरग्यात बंद घर फोडले, ८५ हजारांची चोरी
उमरगा शहरातील शिवपुरी रोड, गजानन मंदिराजवळ राहणारे चंदू चरणसिंग पवार (वय २३) हे बाहेर गावी गेले असता, २५ ते २६ डिसेंबरच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. चोरट्यांनी कपाटातील १३ ग्रॅम सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि २० हजार रुपये रोकड असा एकूण ८५,५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२. समुद्राळ येथे वृद्धाच्या घरी डल्ला
लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील समुद्राळ (ता. उमरगा) येथे दुसरी घटना घडली. येथील रहिवासी गोविंद बळीराम मुळे (वय ७५) यांच्या घराचे कुलूप २६ डिसेंबरच्या रात्री तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. कपाटातील १६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ७४,००० रुपयांचा माल लंपास करण्यात आला. याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
३. धावत्या कंटेनरमधून १.३० लाखांचे टायर लंपास
तिसरी घटना येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत नॅशनल हायवे ५२ वर घडली. फिर्यादी रामजीत शोभनाथ यादव (रा. नालासोपारा) हे आपला कंटेनर (क्र. एनएल ०५ जी २३९२) घेऊन जात असताना, तेरखेडा शिवारात लक्ष्मी पारधी पिडी जवळ अज्ञात चोरट्यांनी कंटेनरचे लॉक तोडले. चोरट्यांनी आतील एमआरएफ कंपनीचे १ लाख ३० हजार ८६ रुपये किमतीचे ६६ टायर (थ्री व्हिलर) चोरून नेले. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
या तिन्ही घटनांमध्ये पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(४), ३०५(अ) आणि ३०५(क) अन्वये गुन्हे दाखल केले असून, पुढील तपास सुरू आहे.






