धाराशिव: भूम तालुक्यातील माणकेश्वर येथील एका शाळा सेवकाने आपल्या हक्काच्या वेतनवाढीचा फरक मिळत नसल्याने येत्या प्रजासत्ताक दिनी (२६ जानेवारी २०२६) शाळेच्या ध्वजस्तंभासमोर विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा गंभीर इशारा दिला आहे. सोमनाथ संदिपान शिंदे असे या कर्मचाऱ्याचे नाव असून, उस्मानाबाद जिल्हा मागासवर्गीय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
नेमके प्रकरण काय?
लोकमान्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, माणकेश्वर येथे सोमनाथ शिंदे हे सेवक म्हणून कार्यरत आहेत. जुलै २००१ ते डिसेंबर २०१५ या कालावधीतील त्यांच्या वेतनवाढीतील फरकाची रक्कम अद्याप त्यांना मिळालेली नाही. मागील २५ वर्षांपासून ते या रक्कमेपासून वंचित असून, मुख्याध्यापक आणि संस्थाचालकांच्या हलगर्जीपणामुळे हा अन्याय झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.
लाच घेतल्याचा गंभीर आरोप
या प्रकरणात एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. सोमनाथ शिंदे यांच्याकडून वेतनवाढीचा फरक मंजूर करून देण्यासाठी तत्कालीन वरिष्ठ लिपिक सतीश पडवळ यांनी ३ वर्षांपूर्वी १०,००० रुपये रोख रक्कम घेतली होती, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. पैसे घेऊनही काम न करता सतीश पडवळ यांनी फसवणूक केली असून ही रक्कम व्याजासह परत मिळावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
संभाव्य अनर्थ टाळण्याची मागणी
सोमनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून आपल्या व्यथा मांडल्या आहेत. जर वेतनवाढीचा फरक व्याजासह त्यांच्या बँक खात्यात जमा झाला नाही, तर २६ जानेवारी २०२६ रोजी शाळेत ध्वजवंदनावेळी ते आत्महत्या करतील.
प्रजासत्ताक दिनाला गालबोट लागू नये म्हणून प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी. संबंधित मुख्याध्यापक, संस्था सचिव आणि लिपिक यांच्याकडून व्याजाची रक्कम वसूल करून शिंदे यांना न्याय द्यावा, अन्यथा शिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाईची मागणी केली जाईल, असे संघटनेचे अध्यक्ष पी.एस. ननवरे आणि कार्याध्यक्ष अनिता पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.






