धाराशिव: नुकत्याच पार पडलेल्या धाराशिव नगर पालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाने मुसंडी मारत उल्लेखनीय कामगिरी केली. या यशाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा आणि लढवय्या उमेदवारांचा सत्कार समारंभ नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या सत्कार समारंभास पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील, राष्ट्रीय युवती अध्यक्षा सौ. सक्षणाताई सलगर, प्रदेश सरचिटणीस मसूदभाई शेख, माजी नगराध्यक्ष खलिफाभाई कुरेशी यांच्यासह पक्षाचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


विजयी शिलेदारांचा सन्मान
यावेळी मान्यवरांच्या हस्ते नवनिर्वाचित नगरसेवक खलिफाभाई कुरेशी, शहराध्यक्ष व नगरसेवक बबलू उर्फ आयाज शेख, इस्माईल शेख, सुनील आंबेकर, विशाल शिंगाडे, अजाज काझी, तेजस देवकते आणि सरफराज कुरेशी यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
लढवय्या उमेदवारांचेही कौतुक
केवळ विजेतेच नव्हे, तर ज्यांनी पक्षासाठी निकराची लढत दिली, अशा अल्पमताने पराभूत झालेल्या उमेदवारांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. यामध्ये राहुल गवळी, प्रशांत पवार, प्रियंका ताई गायकवाड, ॲड. विवेक घोगरे, संध्याताई बागल यांच्यासह इतर २३ उमेदवारांचा समावेश होता. “सर्व उमेदवारांनी पूर्ण ताकद, जिद्द व चिकाटीने निवडणूक लढवली,” अशा शब्दांत मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.
पवारांचे विचार तळागाळात – मान्यवरांचे प्रतिपादन
“खासदार शरदचंद्र पवार यांचे विचार आजही तळागाळात जिवंत आहेत आणि धाराशिव नगर पालिकेतील हा विजय त्याचेच ज्वलंत उदाहरण आहे,” अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या. नवनिर्वाचित नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी आणि जनसेवेसाठी सदैव तत्पर राहण्याची शपथ यावेळी घेतली.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमास तुळजापूर तालुका अध्यक्ष धैर्यशील भैया पाटील, परंडा तालुका अध्यक्ष किरण करळे, महिला जिल्हाध्यक्ष मनीषाताई पाटील, युवक जिल्हाध्यक्ष शेखरजी घोडके, उद्योग व व्यापारी जिल्हाध्यक्ष विठ्ठल माने, डॉक्टर सेलचे डॉ. अविनाश तांबारे यांच्यासह विविध आघाड्यांचे प्रमुख, सरपंच आणि पदाधिकारी उपस्थित होते.






