नळदुर्ग – तुळजापूर तालुक्यातील कार्ला येथे जुन्या वादातून किंवा अन्य कारणावरून बेकायदेशीर जमाव जमवून एका कुटुंबावर तलवारीने आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात महिला फिर्यादीसह घरातील पाच जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कार्ला (ता. तुळजापूर) येथे दि. २२ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी सौ. चित्रकला रवींद्र देवकर (वय ३०, रा. कार्ला) या घरी असताना आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवला. आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि तलवारीने मारहाण करून जखमी केले.
तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेले फिर्यादीचे पती रवींद्र देवकर, चुलत सासरे संजय देवकर, दीर जितेंद्र देवकर आणि सासू तेजश्री देवकर यांनाही आरोपींनी लोखंडी रॉड, काठी आणि दगडाने जबर मारहाण केली. या हल्ल्यात हे सर्वजण जखमी झाले असून, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली.
उपचारानंतर फिर्यादी चित्रकला देवकर यांनी २८ डिसेंबर रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी लहु चिंदा चोपडे, दीपक महादेव इरकर, लक्ष्मी संजय देवकर, विश्वनाथ जिंदार चोपडे, अजय बालाजी देवकर, बालाजी रावसाहेब देवकर, महादेव इरकर, संभाजी सुरेश देवकर आणि अण्णा दिगंबर देवकर (सर्व रा. कार्ला) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), १८९, १८९(२), १९१(२)(३) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नळदुर्ग पोलीस करत आहेत.






