धाराशिव: ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्याचा दुसरा हप्ता बँक खात्यात जमा करण्यासाठी ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ताब्यात घेतले आहे. रमेश मालू वाघमारे (वय ३७, रा. कुनकी, ता. जळकोट, जि. लातूर) असे या लाचखोर लिपिकाचे नाव आहे. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
या प्रकरणातील ४७ वर्षीय तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील अर्थसाह्याचा दुसरा हप्ता जमा करण्यासाठी समाजकल्याण कार्यालयातील समाजकल्याण निरीक्षक कपिल थोरात यांनी २० हजार रुपये आणि कनिष्ठ लिपिक रमेश वाघमारे याने ५ हजार रुपयांची मागणी केल्याचे तक्रारीत म्हटले होते.
पडताळणी आणि कारवाई
या तक्रारीची दखल घेत एसीबीने ४, ७ आणि ११ डिसेंबर २०२५ रोजी पडताळणी केली. यावेळी निरीक्षक कपिल थोरात यांनी लाचेची मागणी केली नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, लिपिक रमेश वाघमारे याने पंचांसमक्ष ५ हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर ११ आणि १२ डिसेंबर रोजी सापळा लावण्यात आला होता. मात्र, रमेश वाघमारे याला संशय आल्याने त्याने पैसे स्वीकारण्यास नकार दिला आणि भेट टाळली. परंतु लाचेची मागणी सिद्ध झाल्याने आज (दि. ३१) एसीबीने वाघमारे याला ताब्यात घेतले आहे.
मुद्दामाल जप्त
आरोपीच्या अंगझडतीत एक ४० हजार रुपये किमतीची होंडा ॲक्टिवा स्कूटर आणि १० हजार रुपयांचा वन प्लस कंपनीचा मोबाईल असा मुद्देमाल मिळून आला आहे. तसेच त्याच्या घराची झडती घेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एसीबीने दिली आहे.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक (ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर) श्रीमती माधुरी केदार कांगणे, अपर पोलीस अधीक्षक शशिकांत शिंगारे, पोलीस उपअधीक्षक (धाराशिव) योगेश वेळापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बाळासाहेब नरवटे आणि त्यांच्या पथकाने (विजय वगरे, आशिष पाटील, विशाल डोके, जाकेर काझी, शशिकांत हजारे) केली.
नागरिकांना आवाहन:
कोणत्याही शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने कामासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
टोल फ्री क्रमांक: १०६४






