धाराशिव: तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांच्या एका भाषणाची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. “पुढच्या ५० पिढ्या आम्हीच इथे राज्य करणार,” या मल्हार पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेत शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हा प्रवक्ते जगदिश पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. “सत्तेची नशा उतरवायला वेळ लागणार नाही,” अशा शब्दांत त्यांनी पाटलांना इशारा दिला आहे.
नेमकं प्रकरण काय?
मल्हार पाटील यांनी तुळजापुरात एका कार्यक्रमात बोलताना, “पुढच्या ५० पिढ्या आम्हीच इथे राज्य करणार,” असे विधान केल्याचे समोर आले आहे. या विधानाचा खरपूस समाचार घेत जगदिश पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, “सोनेचा चमचा घेऊन जन्मलेल्या वारसदाराचे हे वक्तव्य सत्तेच्या नशेमुळे आले आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचा मुलगा असण्यापलीकडे त्यांचे दुसरे कोणतेही कर्तृत्व नाही.”
‘४० वर्षात जिल्हा मागास ठेवला’
पाटील कुटुंबियांच्या राजकारणावर टीका करताना जगदिश पाटील म्हणाले की, “गेली ४० वर्षे यांनी जिल्ह्याला लुटण्याचे काम केले. आज देशामध्ये धाराशिव जिल्हा तिसऱ्या क्रमांकाचा मागास जिल्हा म्हणून ओळखला जातो, हेच यांचे विकासकार्य आहे.”
राणा पाटलांना सल्ला आणि इशारा
यावेळी जगदिश पाटील यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनाही लक्ष्य केले. “तुम्ही सुसंस्कृतपणाचा आव आणता, मग मुलाला अशी भाषा शिकवणे दुर्दैवी आहे. त्याला आवरा, अन्यथा जनतेला हा माज कसा उतरवायचा हे चांगलेच ठाऊक आहे,” असा इशारा त्यांनी दिला.
खासदार ओमराजेंचे नेतृत्व आणि तरुणांचे संघटन
धाराशिवमध्ये पुरोगामी आणि निर्व्यसनी राजकारणासाठी खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वाखाली तरुणांचे मोठे संघटन उभे राहत असल्याचे सांगत, “धाराशिवच्या मातीतील पैलवान तयार आहेत,” असे आव्हानही शेवटी जगदिश पाटील यांनी दिले आहे.






