धाराशिव: नळदुर्ग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतिगृहातील कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ‘पार्टी’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषदेने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष रत्नशील थोरात यांनी दिला आहे.
नळदुर्ग येथील शासकीय वसतिगृहाच्या कार्यालयात काही दिवसांपूर्वी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ‘पार्टी’ साजरी केली होती. या प्रकाराची चर्चा प्रसारमाध्यमांतूनही झाली होती. अशा प्रकारचे कृत्य शासकीय कार्यालयास अशोभनीय असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
रत्नशील थोरात यांनी स्वतः या वसतिगृहास भेट देऊन पाहणी केली असता, तेथील विद्यार्थ्यांनी त्यांना जेवणाचा दर्जा अतिशय निकृष्ट असल्याचे तोंडी सांगितले. या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेत, संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून तात्काळ कारवाई करावी आणि केलेल्या कारवाईचा अहवाल द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात रत्नशील थोरात यांनी समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यांना निवेदन दिले असून, जिल्हाधिकाऱ्यांनाही याची प्रत देण्यात आली आहे. वसतिगृहाच्या कार्यालयात पार्टी करणे आणि प्रसारमाध्यमांतून त्याची चर्चा होणे हे शासकीय कार्यालयास अशोभनीय असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, प्रत्यक्ष भेटीत विद्यार्थ्यांनी जेवणाचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार केल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना रत्नशील थोरात म्हणाले की,
“डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह नळदुर्ग येथे झालेला प्रकार हा निंदनीय आहे. असे प्रकार कोणत्याही वसतीगृहात होऊ नये, याबद्दल सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धाराशिव यांनी उपाययोजना करून दोषी कर्मचारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. अन्यथा रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद धाराशिव जिल्ह्याच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल.”
– रत्नशील सहदेव थोरात (रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद, धाराशिव जिल्हा)
प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून कारवाईचा अहवाल सादर करावा, अशी मागणी संघटनेने लावून धरली आहे.






