परंडा : परंडा तालुक्यातील भोत्रा येथे शेतातील बांध कोरल्याच्या कारणावरून आणि जुन्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. या घटनेत कोयता, दगड आणि लाथाबुक्यांचा वापर करण्यात आला असून, दोन्ही गटांतील व्यक्ती जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूंच्या फिर्यादीवरून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिली फिर्याद: कोयत्याने मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी
राजेंद्र ज्ञानदेव शिंदे (वय ३०, रा. भोत्रा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता भोत्रा येथील शेत गट नं. २० (ब) मध्ये ही घटना घडली. जुन्या भांडणाची कुरापत काढून ब्रम्हदेव आबा शिंदे, धुळदेव आबा शिंदे आणि सुरज धुळदेव शिंदे यांनी राजेंद्र शिंदे यांना शिवीगाळ केली. त्यानंतर लाथाबुक्यांनी, दगडाने आणि कोयत्याने मारहाण करून जखमी केले. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
या फिर्यादीवरून परंडा पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) आणि शस्त्र अधिनियम ४/२५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
दुसरी फिर्याद: शेतातील बांध कोरल्यावरून वाद
दुसऱ्या बाजूने धुळदेव आबा शिंदे (वय ३९, रा. भोत्रा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार, दि. १२ जानेवारी रोजी सकाळी १०:०० वाजता शेत गट नं. २० (अ) मध्ये राजेंद्र ज्ञानदेव शिंदे आणि ज्ञानदेव विठ्ठल शिंदे यांनी शेतातील बांध कोरल्याच्या कारणावरून वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी धुळदेव शिंदे यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी व दगडाने मारहाण केली. तसेच त्यांचा मुलगा सुरज आणि भाऊ ब्रम्हदेव यांनाही धमकावण्यात आले.
या तक्रारीवरून राजेंद्र शिंदे आणि ज्ञानदेव शिंदे यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. परंडा पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






