धाराशिव – शहरातील महाजन गल्ली भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने कपाटातील चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी जयंत बाळकृष्ण महाजन (वय ६७, मूळ रा. महाजन गल्ली, धाराशिव) हे सध्या थेरगाव फाटा, पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे राहतात. त्यांचे धाराशिव येथील घर बंद असताना चोरट्यांनी ही संधी साधली. दि. १० जानेवारी रोजी रात्री ११:०० ते दि. ११ जानेवारी रोजी सकाळी ११:०० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने कपाटातील सुमारे ११,००० रुपये किमतीचे चांदीचे दागिने लंपास केले.
घरफोडी झाल्याचे लक्षात येताच जयंत महाजन यांनी धाराशिव गाठून पोलिसांत तक्रार दिली. त्यांनी दि. १२ जानेवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे.






