धाराशिव: जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणाचे मुख्य केंद्र असलेल्या धाराशिव जिल्हा परिषद आणि त्यांतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा आज राज्य निवडणूक आयोगाने केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या जिल्हा परिषदेसाठी येत्या ५ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारीला जिल्ह्याचा नवा ‘मिलेनिअम’ कारभारी कोण, याचा निकाल जाहीर होईल.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला, ज्यात धाराशिवचा समावेश आहे. या घोषणेसोबतच संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात आजपासूनच निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे.
प्रशासक राज संपणार; लोकशाहीचा उत्सव सुरू
धाराशिव जिल्हा परिषदेचे एकूण ५५ गट आहेत. गेल्या तीन वर्षांपासून निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्हा परिषदेवर प्रशासक काम पाहत होते. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींविना विकासकामे थांबल्याची भावना ग्रामीण भागात होती. आता निवडणूक जाहीर झाल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. जिल्हा परिषदेसोबतच जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या जागांसाठीही याचवेळी मतदान प्रक्रिया पार पडेल.
असा आहे निवडणूक कार्यक्रम:
जिल्हाधिकारी यांच्यामार्फत १६ जानेवारी रोजी निवडणुकीची अधिकृत सूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल.
| टप्पा | दिनांक |
| निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध होणे | १६ जानेवारी २०२६ |
| उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत | १६ ते २१ जानेवारी २०२६ |
| अर्जांची छाननी | २२ जानेवारी २०२६ |
| अर्ज मागे घेण्याची मुदत | २७ जानेवारी (दुपारी ३ वाजेपर्यंत) |
| चिन्ह वाटप | २७ जानेवारी (दुपारी ३.३० नंतर) |
| मतदानाचा दिवस | ५ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७:३० ते ५:३०) |
| मतमोजणी आणि निकाल | ७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी १० पासून) |
राजकीय हालचालींना वेग
जिल्हा परिषदेच्या ५५ गटांसाठी आणि पंचायत समित्यांच्या ११० (अंदाजे) गणांसाठी ही निवडणूक होत असल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. जिल्ह्यावर वर्चस्व राखण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. प्रशासक राज संपवून पुन्हा एकदा लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती सत्ता येणार असल्याने ग्रामीण मतदारांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे.






