वाशी (धाराशिव): दुचाकी बघून देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून एका तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील इंदापूर येथे घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नरसिंग हनुमंत गपाट (वय ३६ वर्षे, रा. इंदापूर) हे मंगळवार, दि. १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ ते १२.१५ च्या सुमारास इंदापूर येथील हॉटेल हर्षद येथे होते. यावेळी आरोपी निलेश लगाडे (रा. इंदापूर) याने फिर्यादींना ‘मोटरसायकल बघून दे’ असे सांगितले. मात्र, नरसिंग गपाट यांनी त्यास नकार दिला.
दुचाकी बघून देण्यास नकार दिल्याने आरोपी निलेश लगाडे याचा राग अनावर झाला. त्याने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने नरसिंग गपाट यांच्यावर चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात गपाट हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या घटनेनंतर जखमी नरसिंग गपाट यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपी निलेश लगाडे याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१), ३५२, ३५१(२), आणि ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.






