परंडा (धाराशिव): परंडा तालुक्यातील भांडगाव शिवारात पाणी पुरवठा पाईपलाईनचा वॉल काढण्याच्या कारणावरून एका व्यक्तीने फिर्यादी आणि त्यांच्या भावांवर पिस्तुलने गोळीबार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, परंडा पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध खुनाचा प्रयत्न आणि शस्त्र अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तांबेवाडी ते सिरसाव यादरम्यान असलेल्या पाणी पुरवठा पाईपलाईनला वॉल काढण्यावरून भांडगाव येथील महेश विठ्ठल राउत (वय ३६ वर्षे) आणि धनाजी अंबऋषी राउत (वय ३५ वर्षे) यांच्यात वाद झाला होता. या वादाचे पर्यावसान मंगळवारी (दि. १३ जानेवारी २०२६) दुपारी ४ ते ४.३० च्या सुमारास हिंसक घटनेत झाले.
धनाजी राउत हे त्यांचे भाऊ दत्तात्रय आणि हनुमंत यांच्यासह भांडगाव शिवारातील शेत गट नं. ३३ ब मध्ये असताना आरोपी महेश राउत याने त्यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने गाठले. आरोपीने फिर्यादी व त्यांच्या दोन्ही भावांचा पाठलाग करत त्यांच्यावर पिस्तुलने गोळीबार केला. सुदैवाने या हल्ल्यातून फिर्यादी बचावले आहेत.
या प्रकरणी फिर्यादी धनाजी राउत यांनी बुधवारी (दि. १४ जानेवारी २०२६) परंडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून आरोपी महेश विठ्ठल राउत याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९, ३५१(२), ३५१(३) तसेच शस्त्र अधिनियम (Arms Act) कलम ३, २५, २७ नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास परंडा पोलीस करत आहेत.






