धाराशिव: धाराशिव नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदासाठी आज (शुक्रवारी) पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (BJP) पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपचे उमेदवार अक्षय ढोबळे यांनी काँग्रेसचे उमेदवार अक्षय जोगदंड यांचा १३ मतांच्या फरकाने पराभव करत उपाध्यक्षपदावर आपली मोहोर उमटवली आहे. या विजयाने पालिकेत भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे.
धाराशिव नगर पालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपचे २२, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ८, शिवसेना ठाकरे गटाचे ७, काँग्रेसचे ३ आणि एमआयएमचा १ नगरसेवक निवडून आला होता. तसेच नगराध्यक्ष म्हणून भाजपच्या नेहा राहुल काकडे निवडून आल्या होत्या.
असा झाला मतांचा फैसला
आज पालिका सभागृहात पार पडलेल्या मतदान प्रक्रियेत भाजपचे संख्याबळ निर्णायक ठरले.
-
अक्षय ढोबळे (भाजप): त्यांना एकूण २३ मते मिळाली (यात भाजपचे २२ नगरसेवक आणि १ नगराध्यक्ष यांचा समावेश आहे).
-
अक्षय जोगदंड (काँग्रेस): त्यांना केवळ १० मते मिळाली.
संख्याबळानुसार भाजपचा विजय अपेक्षित मानला जात होता, तरीही काँग्रेसने उमेदवार दिल्याने या निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. मात्र, भाजपने एकतर्फी विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली.
नवीन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर
उपाध्यक्षपदाच्या निवडीसोबतच पालिकेतील रिक्त असलेल्या चार स्वीकृत सदस्य जागा आणि विविध पक्षांच्या गट नेत्यांची नावेही आज अधिकृतपणे घोषित करण्यात आली.
१. नवनिर्वाचित स्वीकृत सदस्य:
-
भाजप: अमोल राजे निंबाळकर, सुजित साळुंके
-
शिवसेना (ठाकरे गट): पंकज जयंत पाटील
-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): पंकज भोसले
२. पालिकेतील पक्षीय गट नेते:
-
भाजप: अमित शिंदे
-
शिवसेना (ठाकरे गट): प्रदीप मुंडे
-
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट): खलिप्पा कुरेशी
- काँग्रेस – सिद्धार्थ बनसोडे
जल्लोष आणि विकासाची ग्वाही
अक्षय ढोबळे यांच्या विजयाची घोषणा होताच भाजप कार्यकर्त्यांनी पालिका आवारात गुलालाची उधळण करत आणि ढोल-ताशांच्या गजरात मोठा जल्लोष केला.
नवनिर्वाचित उपाध्यक्ष अक्षय ढोबळे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “धाराशिव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नगराध्यक्षांच्या सोबतीने शहराचा कायापालट करण्यासाठी आम्ही जोमाने काम करू.”






