माणसाच्या आयुष्यात श्रद्धा आणि कर्तव्य या दोन गोष्टी श्वासाइतक्याच महत्त्वाच्या असतात. २ जानेवारीचा तो दिवस… माझी तब्यत साथ देत नव्हती, शरीरात म्हणावे तसे त्राण नव्हते. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिला होता, पण मनाची ओढ मात्र ‘मैलारपूर’ (नळदुर्ग) कडे लागली होती. कारण, मी केवळ एक भक्त नाही, तर श्री खंडोबाचा पुजारी आणि देवस्थानचा सचिव आहे. वर्षातून एकदा येणारी ती महायात्रा (२ ते ४ जानेवारी) मला चुकवायची नव्हती. श्रद्धेच्या बळावर मी तिथे गेलो, देवाच्या सेवेत रुजू झालो.
पण म्हणतात ना, शत्रू नेहमी संधीच्या शोधात असतो. मी इकडे देवाच्या दारी लीन होतो आणि तिकडे माझ्या पाठीमागे कटकारस्थाने शिजत होती. माझ्या अनुपस्थितीचा आणि आजारपणाचा फायदा घेत, विरोधकांनी संधी साधली. माझ्यावर खोटा आणि बनावट गुन्हा दाखल करण्यात आला. मला कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा नीच प्रयत्न झाला. पण ज्याच्या पाठीशी साक्षात ‘येळकोट मल्हार’ उभा असतो, त्याचे वाईट कसे होईल? श्री खंडोबा हे सर्व पाहत होता. हे संकट त्यानेच आपल्या खांद्यावर घेतले आणि त्यातून माझी सुखरूप मुक्तताही केली.
मात्र, या संपूर्ण प्रकरणात मनाला लागलेली सर्वांत मोठी वेदना ही शत्रूच्या वारामुळे झाली नाही, तर आपल्याच क्षेत्रातील गद्दारांमुळे झाली. पत्रकारिता हे एक पवित्र व्रत आहे, असे मानून मी गेली ३५ वर्षे या क्षेत्रात रक्ताचे पाणी केले. पण याच क्षेत्रातील काही ‘भामटे’, ज्यांना पत्रकार म्हणवून घ्यायचीही लाज वाटली पाहिजे, त्यांनी विरोधी पार्टीकडून तुकडे मोडले आणि माझ्याविरुद्ध पैसे घेऊन बातम्या छापल्या. ‘पेड न्यूज’च्या माध्यमातून चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केला.
त्यांना मला एवढेच सांगायचे आहे – आज मी जात्यात आहे, तर तुम्ही सुपात आहात! नियतीचे चक्र कोणासाठीही थांबत नाही.
‘धाराशिव लाइव्ह’: एक वादळ, एक विश्वास (१४ वर्षांची तपश्चर्या)
ज्या ‘धाराशिव लाइव्ह’ला संपवण्याचे स्वप्न तुम्ही बघत आहात, त्याचा पाया ठिसूळ नाही. गेली १४ वर्षे… होय, १४ वर्षे अखंडपणे, अविरतपणे ‘धाराशिव लाइव्ह’ या मातीतील अन्यायाविरुद्ध लढत आहे. जेव्हा डिजिटल पत्रकारिता बाल्यावस्थेत होती, तेव्हा आम्ही विश्वासाचे बीज रोवले. आज ते बीज वटवृक्ष झाले आहे. ‘धाराशिव लाइव्ह’ हे केवळ एक न्यूज पोर्टल नाही, तर तो या जिल्ह्यातील प्रत्येक सामान्य माणसाचा, शेतकऱ्याचा आणि पीडिताचा ‘आवाज’ आहे.
या १४ वर्षांत आम्ही कोणापुढेही झुकलो नाही, कोणाचेही लांगुलचालन केले नाही. ऊन, वारा, पाऊस आणि सत्तेचा माज… कशाचीही पर्वा न करता आम्ही फक्त ‘सत्य’ दाखवले. ही १४ वर्षांची कमाई पैशांची नाही, तर जनतेच्या प्रेमाची आहे. त्यामुळेच आज तुम्ही कितीही अपप्रचार केला, तरी ‘धाराशिव लाइव्ह’ची विश्वासार्हता तुम्ही तसूभरही कमी करू शकत नाही.
मी सत्याची वाट धरली आहे, म्हणून हा त्रास होतोय, हे मला मान्य आहे. खोटे गुन्हे दाखल होतील, बदनामी होईल, पण माझा कणा ताठ आहे. कारण माझ्या मागे माझा ईश्वर आहे आणि माझ्या जनतेचे आशीर्वाद आहेत. ज्यांनी पैशासाठी लेखणी विकली, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी – जेव्हा तुम्ही अडकाल, तेव्हा तुम्हाला वाचवायला देवही येणार नाही.
मी ३५ वर्षे जनसामान्यांसाठी लढलोय, त्यांच्या हक्कासाठी झगडलोय. माझे सर्टिफिकेट मला जनतेने दिले आहे, तुमच्यासारख्या लाचारांच्या प्रमाणपत्राची मला गरज नाही.
हा लढा संपलेला नाही, तो आता नव्याने सुरू झाला आहे.
जय मल्हार!
–सुनील ढेपे (संपादक, धाराशिव लाइव्ह)





