तामलवाडी: तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे जमिनीच्या वाटणीच्या जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सावरगाव येथे घडली. फिर्यादी चैतन्य रघुनाथ लिंगफोडे (वय २५) आणि आरोपी वैभव उर्फ शंकर विश्वनाथ लिंगफोडे (वय २४, दोघे रा. सावरगाव) यांच्यात शेतीच्या वाटणीवरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता.
याच जुन्या भांडणाचा राग मनात धरून, १४ जानेवारीच्या रात्री आरोपी वैभवने चैतन्य यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने चैतन्य यांच्यावर कोयत्याने वार केले, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
जखमी चैतन्य लिंगफोडे यांनी १६ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून तामलवाडी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ (हत्येचा प्रयत्न) आणि ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याची दखल घेत तामलवाडी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी वैभव उर्फ शंकर लिंगफोडे याला बेड्या ठोकल्या आहेत.
सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, गुन्ह्याचा पुढील तपास तामलवाडी पोलीस करत आहेत.




