तुळजापूर: तीर्थक्षेत्र तुळजापूर येथील एका लॉजमधून तब्बल ९ लाख रुपयांचे महागडे कॅमेरे आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नागय्या बसय्या मंडी (वय ३१, रा. चक्रकट्टा, गाजीपूर, कलबुर्गी) हे तुळजापूर येथे आले असता तेथील ‘दसरा एक्झिक्युटिव्ह’ (Dasara Executive) या लॉजवर थांबले होते. दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६:४५ ते ७:०० वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
आरोपी कार्तिक एस. (रा. तिरुपती, आंध्र प्रदेश) याने लॉजमधून फिर्यादीचे अत्यंत महागडे साहित्य चोरून नेले. चोरीला गेलेल्या मुद्देमालामध्ये खालील वस्तूंचा समावेश आहे:
-
कॅनन डिजिटल कॅमेरा (EOS R5 MK2 Body)
-
सोनी कॅमेरा (Model ILCE-7 M4)
-
सिग्मा कंपनीच्या दोन लेन्स (85mm आणि 50mm)
-
रिअर फिल्टर होल्डर
-
एक आयफोन (iPhone)
असा एकूण ८ लाख ९४ हजार ८९५ रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला.
याप्रकरणी नागय्या मंडी यांनी १६ जानेवारी २०२६ रोजी तुळजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी कार्तिक एस. याच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तुळजापूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.




