परंडा – सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जिवाला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने हातात उघडी तलवार घेऊन फिरणाऱ्या एका इसमाला परंडा पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई कौडगाव येथील बसस्थानक चौकात करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास कौडगाव (ता. परंडा) येथील बसस्थानक चौकात एक व्यक्ती बेकायदेशीररीत्या तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून जनार्धन किसन गोरवे (वय ३६, रा. कौडगाव) याला ताब्यात घेतले.
त्याच्या झडतीमध्ये ५०० रुपये किमतीची एक लोखंडी तलवार आढळून आली. ही तलवार विनापरवाना बाळगून तो लोकांच्या जीवितास धोका निर्माण करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी सदर तलवार जप्त केली आहे.
याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार राहुल चतुर्भुज खताळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी जनार्धन गोरवे याच्याविरुद्ध शस्त्र कायदा कलम ४, २५ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



