धाराशिव: पूर्वी लग्न ठरले होते, मात्र संबंधित तरुणी दुसऱ्याच व्यक्तीसोबत निघून गेली. त्यानंतर तरुणाने दुसऱ्या मुलीशी विवाह करून आपला संसार थाटला. तरीही, मागील पाच वर्षांपासून पुण्यातील त्या तरुणीने वारंवार फोन करून त्रास देणे सुरूच ठेवले. अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून धाराशिवमधील एका ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात पुण्याच्या तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धनंजय तात्याराव राऊत (वय ३८, रा. एसटी कॉलनी, सांजा रोड, धाराशिव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत धनंजय राऊत आणि आरोपी शितल जगदीश राऊत (वय ३४, रा. पुणे) यांचे लग्न ठरले होते. मात्र, त्यावेळी आरोपी शितल ही दुसऱ्या व्यक्तीसोबत गेल्याने हे लग्न मोडले होते. पुढे धनंजय यांचे लग्न दुसऱ्या मुलीशी झाले आणि त्यांचा संसार सुरळीत सुरू होता.
मात्र, मागील पाच वर्षांपासून शितल राऊत ही धनंजय यांना वारंवार फोन करून मानसिक त्रास देत होती. तिच्या या सततच्या जाचाला कंटाळून धनंजय यांनी १६ डिसेंबर २०२५ रोजी रात्री पावणेदहा वाजण्यापूर्वी धाराशिव येथील बेगडा शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केली.
या दुर्दैवी घटनेनंतर तब्बल महिनाभराने, म्हणजेच १७ जानेवारी २०२६ रोजी मयताचे भाऊ विशाल तात्याराव राऊत (वय ३५) यांनी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी शितल राऊत हिच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






