वाशी: शेतीच्या जुन्या वादातून एका ६५ वर्षीय वृद्धाला शिवीगाळ करत चक्क दुधाच्या कॅनने मारहाण केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील इंदापूर येथे घडली आहे. या मारहाणीत वृद्ध गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरख पांडुरंग गपाट (वय ६५, रा. इंदापूर, ता. वाशी) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी त्यांनी भारत विष्णू गपाट (रा. इंदापूर) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख गपाट आणि आरोपी भारत गपाट यांच्यात शेतीचा वाद आहे. याच वादातून मंगळवारी (दि. १३ जानेवारी २०२६) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास इंदापूर येथे आरोपीने गोरख यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपीने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने हातातील दुधाच्या कॅनने गोरख गपाट यांना जबर मारहाण केली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले. तसेच, यावेळी आरोपीने त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.
उपचारानंतर गोरख गपाट यांनी शनिवारी (दि. १७) वाशी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी भारत गपाट विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१) (दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करणे), आणि ३५१(२)(३) (गुन्हेगारी धमकी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास वाशी पोलीस करत आहेत.






