भूम: एका पिकअप वाहनातून अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूरपणे वासरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या टोळीवर भूम पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३७ जर्सी गाईच्या वासरांची सुटका केली असून, याप्रकरणी अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नासिर सलिम जारेकरी, जमील संमस कुरेशी आणि सादीक जाफर कुरेशी (सर्व रा. सिद्धार्थनगर, ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. १७ जानेवारी २०२६) सकाळी ७ वाजेच्या सुमारास भूम शहरातील गोलाई चौक ते पाथर्डी रोडवर ही कारवाई करण्यात आली. एमएच ४५ टी ४०९२ या क्रमांकाच्या पिकअप वाहनाची तपासणी केली असता, त्यात जर्सी गाईची ३७ वासरे (एकूण किंमत ३७ हजार रुपये) आढळून आली.
आरोपींनी या मुक्या प्राण्यांना वाहनात दाटीवाटीने भरले होते. त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही सोय करण्यात आली नव्हती आणि त्यांना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या निर्दय वाहतुकीची गंभीर दखल घेत भूम पोलिसांनी तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
याप्रकरणी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भूम पोलीस ठाण्यात ‘प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम’ कलम ११(१)(ड), सहकलम ४७, ५४, ५६ (प्राण्यांचे परिवहन नियम) आणि ‘महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम’ कलम ११, ५ (अ) (ब), ६, ९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






