उमरगा: शहरात सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या जीवास धोका होईल अशा पद्धतीने हातात उघडा कोयता घेऊन फिरणाऱ्या दोघा तरुणांना उमरगा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. शनिवारी (दि. १७) सायंकाळी चौरस्ता भागात ही कारवाई करण्यात आली.
मोईन खादीर मुल्ला (वय २०, रा. बलसुर) आणि इरफान अब्दुल रहेमान कुरेशी (वय १९, रा. भिमनगर, उमरगा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास उमरगा येथील चौरस्ता परिसरातून लातूरकडे जाणाऱ्या रोडवर अमर हॉटेलसमोर हे दोन तरुण संशयास्पदरित्या फिरत होते. पोलिसांनी त्यांना थांबवून तपासणी केली असता, त्यांच्याकडे विनापरवाना एक लोखंडी कोयता मिळून आला. सार्वजनिक ठिकाणी हे घातक शस्त्र बाळगून त्यांनी लोकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे निदर्शनास आले.
पोलिसांनी त्यांच्याकडील कोयता जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार बळीराम नवनाथ सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध शस्त्र कायदा कलम ४, २५, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २२३ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





