धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांनी मोठा राजकीय डाव टाकला आहे. पाटील यांनी एकाच वेळी तेर आणि केशेगाव या दोन गटांतून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. एकाच वेळी दोन ठिकाणांहून अर्ज भरल्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
अध्यक्षपदावर डोळा?
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद यावेळी महिला (खुला प्रवर्ग) साठी राखीव आहे. अर्चना पाटील यांनी आपले मूळ गाव असलेल्या ‘तेर’ गटासोबतच ‘केशेगाव ‘ गटातूनही उमेदवारी दाखल केल्याने, त्या अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. सुरक्षितता आणि राजकीय रणनीतीचा भाग म्हणून त्यांनी दोन जागांवरून नशीब आजमावण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
लोकसभेचा पराभव अन् आता पुन्हा मैदानात
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (घड्याळ) चिन्हावर निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचे दीर आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी त्यांचा तब्बल सव्वातीन लाख मतांनी पराभव केला होता. या मोठ्या पराभवानंतर आता पुन्हा एकदा हातात कमळ घेऊन अर्चना पाटील जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरल्या आहेत, त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे.उद्या (बुधवारी) उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
निवडणूक कार्यक्रम (तपशील):
-
उमेदवारी अर्ज भरणे: १६ ते २१ जानेवारी २०२६ (बुधवारी शेवटचा दिवस)
-
अर्जांची छाननी: २२ जानेवारी २०२६
-
अर्ज माघार: २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३ वाजेपर्यंत)
-
चिन्ह वाटप: २७ जानेवारी २०२६ (दुपारी ३.३० नंतर)
-
मतदान: ५ फेब्रुवारी २०२६ (सकाळी ७:३० ते ५:३०)
-
निकाल: ७ फेब्रुवारी २०२६ (सकाळी १० पासून)







