मंडळी, धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आणि तीन वर्षे प्रशासकीय राजवटीत ‘उपवास’ केलेल्या नेत्यांच्या पोटातील भुकेचा आगडोंब आता बाहेर पडलाय. ५ फेब्रुवारीला मतदान आणि ७ ला निकाल, पण खरी मजा तर आता २७ जानेवारीपर्यंतच्या ‘माघार’ नाट्यात आणि ‘चिन्ह वाटपाच्या’ सर्कसमध्ये आहे!
सध्या धाराशिवच्या राजकीय बाजारात एकच चर्चा आहे— “तिकीट माझे, माणूस तुझा, पण खिशात मात्र फक्त आणि फक्त राणादादा!”
ऑपरेशन ‘खिसा’: उजवीकडे शिंदे, डावीकडे अजितदादा!
धाराशिवच्या राजकारणात सध्या भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची जादू अशी काही चालली आहे की, मोठमोठे गारुडी सुद्धा लाजावेत. महायुती झाली खरी, पण ती कोणाची आणि कोणासोबत, हे समजायला मतदारांना डोक्याला बाम लावावा लागतोय.
राणादादांनी राजकारणाचे नवीन गणित मांडले आहे:
-
उजवा खिसा: यात त्यांनी सन्मानाने शिवसेना (शिंदे गट) ठेवली आहे.
-
डावा खिसा: यात राष्ट्रवादी (अजित पवार गट) अलगद सामावली आहे.
आणि गंमत बघा, या दोन्ही खिशातल्या पक्षांना शांत ठेवण्यासाठी दादांनी एका हाताने ‘गाजर’ (शिंदे गट) आणि दुसऱ्या हाताने ‘हलवा’ (अजित पवार गट) असा प्रसाद वाटला आहे. परिणामी, महायुतीचे ‘कमळ’ फुलले की नाही माहीत नाही, पण निष्ठावंतांचे चेहरे मात्र कोमेजून गेले आहेत!
शिंदे गटाची अवस्था: ‘नाव आमचे, उमेदवार तुमचे’ (भाड्याने उमेदवार उपलब्ध!)
शिंदे गटाची अवस्था तर “धनी कुणीही असू दे, कारभारी आपलाच पाहिजे” अशी झाली आहे. पळसप, जागजी आणि येडशी—या तीन ठिकाणची कथा ऐकली तर हसावे की रडावे हेच कळत नाही.
शिंदे गटाला जागा सुटल्या, पण उमेदवार कुठले? तर भाजपचे!
-
पळसप गट: इथे भाजपच्या मुशीत वाढलेले माजी झेडपी अध्यक्ष नेताजी बोंदर-पाटील यांना उमेदवारी मिळाली. गम्मत म्हणजे बोंदर-पाटलांचे तिथे मतदानही नाही आणि शिंदे गटात अधिकृत प्रवेशही नाही, तरीही हातात थेट ‘ए’ फॉर्म! तिकडे शिंदे गटाचे बिचारे निष्ठावंत तालुकाप्रमुख अजित लाकाळ, ज्यांनी अडीच वर्षे पक्ष सांभाळला, त्यांच्या हातात ‘बी’ फॉर्म देऊन “तू फक्त स्टँडबाय राह बाबा,” असे सांगण्यात आले आहे.
-
जागजी आणि येडशी: इथेही तीच तऱ्हा. पांडुरंग सावंत आणि संतोष सस्ते हे मूळचे भाजपचे, पण आता ते अचानक शिवसैनिक झालेत (तात्पुरते!)
-
.येडशीमध्ये आजवर शिंदे गटाची पालखी वाहिलेले शशांक सस्ते, हे काय बरोबर नाही म्हणून रुसून बसलेत.
निष्ठावंत शिवसैनिकांची अवस्था अशी झालीय की, “वाळवी शिवसेनेला लागली की भाजपची माणसं वाळवी म्हणून पक्षात घुसली?” याचा शोध घेण्याची वेळ आली आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि संपर्कप्रमुख राजन साळवींवर शिवसैनिक इतके चिडलेत की, “आमचा पक्ष भाजपच्या दावणीला गहाण ठेवलाय का?” असे प्रश्न विचारले जात आहेत. थोडक्यात काय, तर धनुष्यबाण शिंदेंचा, पण तो चालवणारा राम मात्र भाजपचा!
बेंबळीत ‘पार्सल’ राजकारण आणि भाजपच्या वाघांचे अश्रू
इकडे राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि भाजपच्या युतीत बेंबळी गटात तर वेगळाच ड्रामा सुरू आहे. ही जागा तडजोडीत दादांच्या गटाला सुटली. बरं, स्थानिक उमेदवार दिला असता तर गोष्ट वेगळी होती, पण थेट तुळजापूरच्या मंगरुळवरून महेंद्रकाका धुरगुडे नावाचे ‘पार्सल’ बेंबळीत इम्पोर्ट करण्यात आले.
यामुळे भाजपचे ३५ वर्षांचे तपस्वी रामदास कोळगे (जे संघाच्या मुशीत घडलेत) आणि २० वर्षे सोशल मीडियावर पक्षासाठी केसेस अंगावर घेणारे पांडुरंग पवार यांचे धाबे दणाणले. तिकीट कापल्याचे दुःख इतके की, पांडुरंग पवारांना चक्क रडू कोसळले.
सध्याची स्थिती:
“मी लढलो सोशल मीडियावर, केसेस घेतल्या अंगावर… आणि तिकीट मिळालं बाहेरच्या पाहुण्याला!”
कोळगे आणि पवार आता बंडाचे निशाण फडकवून, “निष्ठावंत की इम्पोर्टेड?” या लढाईत उतरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे बेंबळीत ‘घड्याळ’ चालणार की ‘बंडखोर’ वेळेचे काटे उलटे फिरवणार, हे पाहणे रंजक ठरेल.
वेगळी चूल, वेगळे चटके!
एकीकडे राणादादांनी दोन गट खिशात घातलेत, तर दुसरीकडे भूम-परंडा मध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी “माझी बॅट, माझा बॉल” म्हणत वेगळी चूल मांडली आहे. तिकडे उमरगा-लोहऱ्यात रवींद्र गायकवाड “हम नही सुधरेंगे” म्हणत वेगळ्या भूमिकेत आहेत.
म्हणजेच, जिल्हा एक, पण युतीचे नियम अनेक! धाराशिव आणि कळंबमध्ये गळ्यात गळे, आणि भूममध्ये एकमेकांचे वांधे! यालाच म्हणतात अस्सल सोयीचे राजकारण.
पुढचे चित्र काय? (२७ जानेवारीचा सस्पेन्स)
आता २७ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे.
-
ज्या ‘इम्पोर्टेड’ उमेदवारांना एबी फॉर्म मिळालेत, त्यांचे काय होणार?
-
रडणारे निष्ठावंत डोळे पुसून बंडखोरी करणार की पक्षश्रेष्ठींची समजूत (किंवा दमदाटी) कामी येणार?
-
शिंदे गटाचे निष्ठावंत “कमळवाल्या शिवसैनिकांचा” प्रचार करणार का?
सध्या तरी भाजपचे उमेदवार (मग ते स्वतःच्या चिन्हावर असो किंवा उसणे दिलेले असो) जोरात आहेत. नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकांच्या विजयाची नशा अजून उतरलेली नाही. पण, ‘अति तिथे माती’ आणि ‘बंडखोरी तिथे पराभव’ हा इतिहास विसरून चालणार नाही.
शेवटी इतकंच म्हणावं लागेल—
निवडणूक आली दारी, इच्छुकांची गर्दी भारी,
राणादादांच्या खिशात युती, पण निष्ठावंतांची झाली माती!
पाहा कोण मारतोय बाजी, आणि कोणाची होतेय फजिती!
(टीप: हा लेख केवळ राजकीय परिस्थितीवर आधारित विनोदी भाष्य आहे, कृपया कुणीही वैयक्तिक मनावर घेऊ नये, आणि घेतले तरी माघार घेण्याची सोय नाही!)
– बोरूबहाद्दर





