धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असतानाच, आता शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप नेत्यांमध्ये ‘सोशल वॉर’ रंगल्याचे पाहायला मिळत आहे. भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी निवडणुकीबाबत केलेल्या एका विधानावर शिवसेना (ठाकरे गट) प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी फेसबुक पोस्टद्वारे खोचक टोला लगावला आहे.
नेमका प्रकार काय?
जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही दिवसांपूर्वी अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवरून मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. याच संदर्भात आ. राणा पाटील यांनी “मी आताच पेपर फोडणार नाही, दोन दिवस कळ सोसा,” असे विधान केले होते. या विधानाचा समाचार घेत तानाजी जाधवर यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहीत राणा पाटलांना लक्ष्य केले आहे.
जाधवर यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पेपर फोडायचा नसतो म्हणे… अहो, पेपरमध्ये नुसता गोंधळ होता म्हणून का?” त्यांच्या या एका ओळीने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
काय होता तो ‘सस्पेन्स’ ड्रामा?
अर्चना पाटील यांच्या उमेदवारीवरून गेल्या काही दिवसांत मोठा राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अर्चना पाटील यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांनी “आई माघार घेणार आहे,” अशी कुजबूज केल्याने ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. हा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा सुरू असतानाच, सायंकाळी ५ वाजता खुद्द राणा जगजितसिंह पाटील यांनी एन्ट्री घेतली.
जेव्हा पत्रकारांनी त्यांना अर्चना पाटील यांच्या माघारीबद्दल विचारले, तेव्हा त्यांनी, “मी आताच पेपर फोडणार नाही… दोन दिवस वाट पाहा!” असे उत्तर दिले होते.
बाप-लेकाच्या विधानांत विरोधाभास?
एकीकडे मुलाने माघारीची भाषा करणे आणि दुसरीकडे वडिलांनी ‘सस्पेन्स’ कायम ठेवणे, यामुळे हा गोंधळ घरातला आहे की राजकीय रणनीतीचा भाग, असा प्रश्न उपस्थित झाला होता. याच संभ्रमावर बोट ठेवत तानाजी जाधवरांनी हा ‘पेपर फुटी’चा टोला लगावला आहे. आता यावर राणा पाटील काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.





