तुळजापूर: तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पार्टीने स्थानिक नेतृत्वाला डावलून ‘गेटकेन’ (बाहेरचा) उमेदवार लादल्याने पक्षात मोठी बंडखोरी उफाळून येण्याची शक्यता आहे. गेल्या दहा वर्षांपासून पक्षासाठी निष्ठेने काम करणाऱ्या सौ. शीतल अनंत ढाले यांना उमेदवारी नाकारून, मतदारसंघात कोणताही संपर्क नसलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता कांबळे यांना तिकीट दिल्याने स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि मतदारांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
निष्ठावंतांच्या मेहनतीवर पाणी
सौ. शीतल अनंत ढाले या गेल्या दशकभरापासून भाजपचे काम तळागाळात पोहोचवत आहेत. उमेदवारी मिळण्याचे ठोस संकेत मिळाल्यामुळे त्यांनी संपूर्ण सिंदफळ गटात जोरदार जनसंपर्क अभियान राबवले होते. गावोगावी भेटीगाठी आणि मतदारांच्या समस्या जाणून घेत त्यांनी पक्षासाठी अनुकूल वातावरण तयार केले होते. मात्र, ऐनवेळी त्यांची उमेदवारी कापण्यात आल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे.
‘शहापूर’चा अनुभव आणि ‘सिंदफळ’चा विरोध
भाजपने उमेदवारी दिलेल्या अस्मिता कांबळे या शहापूर गटाच्या माजी सदस्या आहेत. शहापूरमध्ये असताना त्यांनी कोणतीही ठोस विकासकामे केली नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत. शहापूरमधील जनतेचा भ्रमनिरास केल्यानंतर आता ज्या सिंदफळ गटात त्यांचा साधा जनसंपर्कही नाही, तिथे त्यांना उमेदवारी देणे हे स्थानिक मतदारांचा अवमान असल्याचे बोलले जात आहे. मतदारसंघात साधी फेरीही न मारलेल्या उमेदवाराला स्वीकारण्यास स्थानिक जनता तयार नाही.
पंचायत समितीलाही फटका बसण्याची भीती
जिल्हा परिषदेच्या या चुकीच्या निर्णयाचा फटका भाजपला केवळ जिल्हा परिषदेतच नव्हे, तर त्यांच्यासोबत असलेल्या दोन पंचायत समिती सदस्यांनाही बसण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागात पक्षाचे मोठे नुकसान होऊ शकते, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
“आम्हाला स्थानिकच हवा!”
सध्या सिंदफळ गटातील गावच्या कट्ट्यावर आणि चौकाचौकात एकच चर्चा रंगली आहे. “बाहेरचा उमेदवार आमच्यावर लादण्यापेक्षा, आमच्यात राहणारा आणि आमच्या सुख-दुःखात सहभागी होणारा स्थानिक उमेदवारच आम्हाला हवा आहे,” अशी स्पष्ट भूमिका मतदारांनी घेतली आहे. ग्रामीण भागाशी नाळ तुटलेला उमेदवार दिल्यास मतदार भाजपला धडा शिकवण्याच्या तयारीत असून, हा निर्णय भाजपच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.




