धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळत आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि भाजप नेते नेताजी पाटील यांनी ‘उपळा’ गटातून आपली उमेदवारी मागे घेतली असून, आता ते ‘पळसप’ गटातून नशीब आजमावणार आहेत. विशेष म्हणजे, भाजपचे नेते असलेल्या पाटलांनी आता कमळ सोडून हाती ‘शिवधनुष्य’ घेतले आहे.
-
उमेदवारी आणि माघार: नेताजी पाटील यांनी सुरुवातीला उपळा आणि पळसप या दोन्ही गटांतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, छाननी आणि माघारीच्या प्रक्रियेत त्यांनी उपळा गटातील अर्ज मागे घेतला असून, पळसप गटातील उमेदवारी कायम ठेवली आहे.
-
भाजप सोडून शिंदे गटात: नेताजी पाटील हे मूळचे भाजप नेते आहेत. मात्र, पळसप गटासाठी त्यांना शिवसेना (शिंदे गट) कडून उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे आता ते भाजपचे ‘कमळ’ सोडून शिंदे गटाच्या ‘ शिवधनुष्य या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
-
स्थानिक शिवसैनिकांत नाराजी आणि बंडखोरी:शिंदे गटाने भाजपमधून आलेल्या ‘आयात’ उमेदवाराला तिकीट दिल्याने स्थानिक निष्ठावंत शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली असून, शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख अजित लाकाळ यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे.
-
पुढील लढत चुरशीची:पक्षांतर्गत नाराजी आणि अजित लाकाळ यांनी केलेली बंडखोरी यामुळे ही निवडणूक नेताजी पाटील यांच्यासाठी सोपी असणार नाही. लाकाळ यांनी बंडखोरी कायम ठेवल्यास पळसप गटात नेताजी पाटलांना विजयासाठी कडवा संघर्ष करावा लागेल, असे चित्र सध्या दिसत आहे.






