धाराशिव : “नियम तोडण्यासाठीच असतात,” हे वाक्य राजकारणात किती तंतोतंत लागू पडते, याचा थरार सध्या धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत पाहायला मिळत आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने (हायकमांड) ‘एका घरात एकच पद’ हा नियम लावून आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आणि माजी उपाध्यक्ष अर्चना पाटील यांचे तिकीट कापले खरे, पण राणादादांनी आता थेट पक्षाच्या नियमालाच ‘शह’ देण्याची “गनिमी कावा” नीती आखली आहे.
लोकसभेला झालेला सव्वातीन लाखांचा पराभव विसरून, “खासदारकी हुकली तर हुकली, आता झेडपीचे अध्यक्षपद तरी द्या,” अशी अपेक्षा ठेवून रिंगणात उतरलेल्या अर्चना ताईंसाठी आता भाजपचे अधिकृत उमेदवार ‘बळीचा बकरा’ ठरणार का? याचीच चर्चा सध्या जोरात आहे.
‘दिल्ली पॅटर्न’ विरुद्ध ‘पाटील पॅटर्न’
भाजपचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील मुरूमकर यांनी स्पष्ट केले होते की, दिल्लीच्या नियमानुसार ज्या घरात आधीच आमदार/खासदार आहेत, तिथे जिल्हा परिषदेचे तिकीट मिळणार नाही. या नियमामुळे राणा पाटलांच्या ‘होम पीच’वर अर्चना ताईंचा पत्ता कट झाला.
पक्षाने शिस्तीचा बडगा उगारत:
१. तेर गट: येथून जया नागनाथ नाईकवाडी यांना अधिकृत उमेदवारी (AB फॉर्म) दिली.
२. केशेगाव गट: येथून सुमन प्रवीण भद्रे यांना अधिकृत उमेदवारी दिली.
यामुळे अर्चना पाटील या दोन्ही ठिकाणांवरून तांत्रिकदृष्ट्या ‘अपक्ष’ उमेदवार ठरल्या आहेत. पण खरा ‘खेळ’ इथेच सुरू होतो!
राणादादांची ‘गुगली’: “मी पेपर आताच फोडणार नाही!”
अर्चना ताईंचे तिकीट कापले गेल्यावर सामान्य कार्यकर्ता हिरमुसला असता, पण इथे सूत्रे आमदार राणा पाटलांच्या हाती आहेत. त्यांनी सूचक विधान केले आहे— “मी आताच पेपर फोडणार नाही… दोन दिवस वाट पाहा!”
आतल्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, राणा पाटलांनी एक जबरदस्त खेळी (Masterstroke) रचली आहे.
-
२७ जानेवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे.
-
या वेळेत भाजपच्या अधिकृत उमेदवारांवर दबाव आणून किंवा त्यांची समजूत काढून (जया नाईकवाडी आणि सुमन भद्रे) त्यांचे अर्ज मागे घ्यायला लावायचे.
-
एकदा अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली की, रिंगणात उरलेल्या अर्चना पाटील (अपक्ष) या भाजपच्या अघोषित उमेदवार ठरतील आणि पक्षाला नाईलाजाने त्यांना पाठिंबा द्यावा लागेल.
थोडक्यात काय, तर ‘दरवाजा बंद केला तर आम्ही खिडकीतून येऊ’ असा हा प्रकार आहे!
सोशल मीडियावर ‘इमोशनल अत्याचार’ आणि ‘दैवत’ कार्ड!
एकीकडे ही राजकीय रणनीती शिजत असताना, दुसरीकडे मल्लू नेरुळकर आणि त्यांच्या सोशल मीडिया टीमने फेसबुकवर “रडा आणि लढायला लावा” ही मोहीम सुरू केली आहे.
जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांना टार्गेट करत व्हायरल केलेल्या पोस्टमध्ये कार्यकर्त्यांनी कहर केला आहे. पोस्टचा सारांश असा:
“आम्ही रात्रंदिवस पक्षासाठी काम करतो, धमक्या खातो, ते फक्त पाटील कुटुंबासाठी. पाटील कुटुंब हेच आमचे ‘दैवत’ आहे. जर आमच्या देवाला (अर्चना ताईंना) उमेदवारी मिळणार नसेल, तर आम्ही मंदिरात (पक्षात) कोणासाठी जायचे? दत्ताभाऊ, आम्हाला उत्तर हवंय, नाहीतर सामान्य कार्यकर्त्याला किंमत नाही, असं समजू.”


हा सरळ सरळ पक्षाला केलेला ‘इमोशनल ब्लॅकमेल’ आहे. “तिकीट द्या, नाहीतर बंड करू किंवा काम थांबवू,” असा हा गर्भित इशारा आहे.
पक्षश्रेष्ठी सहन करणार का?
आता प्रश्न असा उरतो की, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश नेतृत्व ही खेळी उघड्या डोळ्यांनी पाहणार का?
-
जर अधिकृत उमेदवारांनी माघार घेतली, तर तो पक्षाच्या शिस्तीचा भंग ठरेल.
-
आणि जर माघार घेतली नाही, तर अर्चना पाटील बंडखोरी करून लढणार का?
लोकसभेत अजित पवार गटाकडून लढताना ‘घड्याळ’ हातात बांधले होते, तिथे पराभव झाला. आता जिल्हा परिषदेत ‘कमळ’ मिळवण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे “हाय रे देवा, येथेही नशीब फुटके निघाले” अशी वेळ येऊ नये, यासाठी २७ जानेवारी दुपारी ३ वाजेपर्यंतचा थरार पाहण्यासारखा असेल.
धाराशिवची जनता आता एकाच गोष्टीची वाट पाहत आहे— ‘पेपर’ फुटल्यावर नक्की कोणाचा ‘कार्यक्रम’ होणार? अधिकृत उमेदवारांचा की पक्षशिस्तीचा?






