धाराशिव: विधानसभा असो वा जिल्हा परिषद, “पार्टी विथ डिफरन्स” म्हणवणाऱ्या भाजपमध्ये सध्या ‘निष्ठावंतांना डच्चू आणि आयातांना गच्चू’ असाच कारभार सुरू असल्याची चर्चा आहे. धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत अंबेजवळगा गटात भाजपने स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला असून, वर्षानुवर्षे पक्षासाठी झिजणाऱ्या माधुरीताई बाबासाहेब गरड यांना डावलून ऐनवेळी आलेल्या ‘पाहुण्यां’ना उमेदवारी दिल्याने संतापाचा लाव्हा उसळला आहे.
नेमका काय आहे ‘अंबेजवळगा’ पॅटर्न?
सहा वर्षांपूर्वी राणा जगजीतसिंह पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकून कमळ हाती घेतले, तेव्हा त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत माधुरीताई गरड यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. “पक्षात काम करा, कामाची पावती मिळेल,” या आशेवर त्या राबल्या.
-
माजी सरपंच (खानापूर) आणि माजी महिला जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाचे काम तळागाळापर्यंत नेले.
-
मागील दोन महिन्यांत अंबेजवळगा गटातील १२ गावे पिंजून काढली.
-
एकदा नव्हे, तर ५ वेळा जनसंवाद फेऱ्या पूर्ण केल्या.
-
स्वतःचे लाखो रुपये खर्च करून ७,००० पत्रके वाटली आणि ‘कमळ’ घराघरात पोहोचवले.
वरिष्ठांनी शब्द दिला होता, “सर्वे आणि ग्राउंड रिपोर्टमध्ये नाव आले तरच तिकीट मिळेल.” माधुरीताईंनी ग्राउंड रिपोर्ट पॉझिटिव्ह आणला, पण तिकीट वाटपाच्या वेळी मात्र ‘रिपोर्ट’ रद्दीत आणि निष्ठावंत खड्ड्यात, अशी गत झाली!
दोन दिवसांच्या पाहुण्याला पायघड्या!
भाजपने सर्वे बाजूला सारत ठाकरे गटातून (उबाठा) अवघ्या दोन दिवसांपूर्वी भाजपमध्ये आलेले शाम जाधव (माजी उपसभापती) यांच्या पत्नी रोहिणी जाधव यांना उमेदवारी बहाल केली. ज्यांनी कालपर्यंत भाजपवर टीका केली, त्यांनाच आज तिकीट मिळाल्याने निष्ठावंतांच्या जखमेवर मीठ चोळले गेले आहे.
…अन् वाघीण पेटून उठली!
पक्षाने वाटाण्याच्या अक्षता लावताच माधुरीताई गरड यांनी बंडखोरीचे निशाण फडकावले आहे. त्यांनी आता अपक्ष म्हणून शड्डू ठोकला असून, “गेटकीन (आयात) उमेदवाराला धडा शिकवणारच,” असा चंग बांधला आहे.
भाजपला अतिआत्मविश्वास नडणार?
केवळ अंबेजवळगाच नाही, तर धाराशिव जिल्ह्यातील ५५ गटांपैकी अनेक ठिकाणी भाजपमध्ये बंडखोरीची वाळवी लागली आहे.
-
नगरपालिका निवडणुकीतील यशाने भाजप हुरळून गेली आहे का?
-
मतदारांना गृहीत धरण्याचे राजकारण नेत्यांच्या अंगलट येणार?
अंबेजवळगा गटात आता ‘निष्ठावंत विरुद्ध पॅराशूट उमेदवार’ असा थेट सामना रंगणार असून, जनसंवाद आणि कष्टाच्या जोरावर माधुरीताई गरड भाजपच्या गणितांना सुरुंग लावणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.






