परंडा (जिल्हा धाराशिव): खानापूर (ता. परंडा) येथे गैरकायद्याची मंडळी जमवून एकाच कुटुंबातील पाच सदस्यांवर लोखंडी पाईप आणि काठीने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात वृद्ध आई-वडिलांसह, पत्नी आणि मुलीलाही मारहाण करण्यात आली असून, फिर्यादीचा मोबाईल फोडून नुकसान करण्यात आले आहे. याप्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात सात जणांवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापु महादेव गटकुळ (वय ४६, रा. खानापुर, ता. परंडा) असे फिर्यादीचे नाव आहे. दि. २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास बापु गटकुळ हे आपल्या घरी होते. यावेळी गावातीलच आरोपी कुमार गटकुळ, योगेश गटकुळ, ऋषीकेश बारसकर, अनिल गटकुळ, राम गटकुळ, तुषार मुळीक आणि कृष्णा गटकुळ हे सर्वजण एकत्र जमून आले.
आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवत बापु गटकुळ यांच्याशी वाद घातला. त्यानंतर आरोपींनी बापु गटकुळ यांच्यासह त्यांची पत्नी, आई सुमन, वडील महादेव आणि मुलगी अंकिता यांना शिवीगाळ करत लोखंडी पाईप व काठीने अमानुष मारहाण केली. यात सर्वजण गंभीर जखमी झाले आहेत. मारहाणीदरम्यान आरोपींनी फिर्यादीचा मोबाईल फोडून नुकसान केले आणि “तुम्हाला जिवे ठार मारू,” अशी धमकी दिली.
या घटनेनंतर जखमी बापु गटकुळ यांनी दि. २३ जानेवारी २०२६ रोजी परंडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी वरील सातही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ११८(१) (दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग), ३५१ (२)(३) (धमकी), ३२४(४) (नुकसान), १८९(२), १९१(२), १९१(३) (दंगल/गैरकायद्याची मंडळी) आणि १९० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. भरदिवसा घडलेल्या या सामुदायिक हल्ल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.






