नळदुर्ग: नळदुर्ग-अक्कलकोट या महत्त्वाच्या मार्गावर अवघ्या वर्षभरापूर्वी ४ कोटी रुपये खर्च करण्यात आले.पण ठेकेदाराचे निकृष्ट काम आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष यामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून, हा रस्ता आता ‘मृत्यूचा सापळा’ बनला आहे. श्रेय घेण्यासाठी सोशल मीडियावर ‘रील्स’ बनवून स्वतःचा उदोउदो करणाऱ्या स्थानिक आमदारांना आता या खडड्यांची जबाबदारी घेण्यास मात्र विसर पडला आहे का? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
नळदुर्ग ते शहापूरपर्यंतच्या ११ किलोमीटर रस्त्याचे डांबरीकरण गेल्या वर्षी करण्यात आले होते. मुळात हा रस्ता चारपदरी होणार होता, परंतु शेतकऱ्यांना मावेजा न दिल्याने आणि प्रकरण न्यायप्रविष्ट झाल्याने केवळ ९ मीटर रुंदीकरणाचे काम करण्यात आले. या कामावर तब्बल ४ कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, वर्ष पूर्ण होण्याआधीच या रस्त्याचे डांबर उखडले असून जागोजागी जीवघेणे खड्डे पडले आहेत. जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आणि निकृष्ट कामाचा हा ‘उत्तम’ नमुना पाहून करदात्यांच्या पैशावर डल्ला मारला गेल्याची चर्चा उघडपणे होत आहे.
आमदारांची ‘फेसबुकिया’ विकासकामे!


रस्ता तयार झाला तेव्हा याच स्थानिक आमदारांनी फेसबुकवर ‘रील्स’ पोस्ट करून “अनेक वर्षांचा प्रश्न सोडवला” असे म्हणत स्वतःची पाठ थोपटून घेतली होती. मात्र, आज तोच रस्ता खड्ड्यात गेला असताना आमदारांचे ते ‘रील’ आता जनतेच्या जखमेवर मीठ चोळत आहे. श्रेय घेण्यासाठी पुढे येणारे लोकप्रतिनिधी आता या रस्त्याच्या दुर्दशेची आणि अपघातांची जबाबदारी घेणार का? हा खरा प्रश्न आहे.
रस्ता की मृत्यूचा सापळा?
या रस्त्याची अवस्था इतकी दयनीय झाली आहे की येथे रोज अपघात होत आहेत. नुकतेच गणेश मंदिराजवळ पडलेल्या एका महाकाय खड्ड्यात दुचाकी आदळून चुंगी येथील एक डॉक्टर गंभीर जखमी झाले . त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सोलापूरला हलवण्यात आले आहे. प्रशासनाच्या आणि कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे निष्पाप नागरिकांचे बळी जात आहेत, पण प्रशासन मात्र ‘ये रे माझ्या मागल्या’ भूमिकेत सुस्त आहे.
नागरिकांचा संताप अनावर
४ कोटी रुपये पाण्यात गेले, रस्ता खड्ड्यात गेला आणि नागरिक रोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. संबंधित कंत्राटदारावर कारवाई करून रस्ता तातडीने दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
ठळक वैशिष्ट्ये:
-
खर्च: ११ किमीसाठी ४ कोटी रुपये (पूर्णपणे वाया).
-
सद्यस्थिती: वर्षभरातच रस्त्यावर मोठमोठे खड्डे.
-
राजकारण: कामाचा दर्जा तपासण्याऐवजी आमदारांची ‘क्रेडिट’साठी धडपड.
-
परिणाम: रोजचे अपघात आणि सामान्य जनतेचा जीव धोक्यात.






