धाराशिव: शेतातील अवघ्या १२ हजार रुपयांच्या एका पाण्याच्या मोटर चोरीचा तपास करताना धाराशिव शहर पोलिसांच्या हाती मोठे यश लागले आहे. पोलिसांनी चार जिल्ह्यांत धुमाकूळ घालणाऱ्या आंतरजिल्हा चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश केला असून, त्यांच्याकडून तब्बल ९८ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत ९ टन तांबे आणि मोठ्या प्रमाणात ॲल्युमिनियम तारा जप्त करण्यात आल्या आहेत.
नेमकी घटना काय?
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिद्धेश्वर वडगाव (ता. जि. धाराशिव) येथील शेतकरी विजय महादेव गुरव (वय ३३) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. १६ ते १७ जानेवारी २०२६ दरम्यान त्यांच्या शेतातील विहिरीवर बसवलेली ५ एचपी क्षमतेची ‘रेन्बो’ कंपनीची पाणबुडी मोटर आणि ५५ ते ६० फूट केबल असा १२ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा (क्र. १८/२०२६) दाखल करण्यात आला होता.
तपासात धक्कादायक माहिती उघड
पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक कुमार दराडे यांच्या नेतृत्वाखाली या गुन्ह्याचा तपास सुरू झाला. तपासी अंमलदार पोलीस नाईक विष्णू बेळे यांनी तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेतला. तपासादरम्यान निष्पन्न झालेल्या आरोपीने आपल्या साथीदारांसह केवळ धाराशिवच नाही, तर सोलापूर, बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्येही अनेक ठिकाणी चोऱ्या केल्याची कबुली दिली. ही टोळी प्रामुख्याने शेतातील मोटर्स, केबल्स आणि इलेक्ट्रिक पोलवरील तारांची चोरी करत असल्याचे समोर आले.
९८ लाखांचा मुद्देमाल जप्त
चोरट्यांनी चोरलेला माल मुरूड (जि. लातूर) येथे नेऊन विकल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकून मोठी कारवाई केली. यामध्ये:
-
वेगवेगळ्या प्रकारचे ९६८७ किलो तांबे (कॉपर) – किंमत अंदाजे ९६ लाख ८७ हजार रुपये.
-
विद्युत वाहक ७५० किलो तारा (ॲल्युमिनियम) – किंमत अंदाजे १ लाख ५० हजार रुपये.
असा एकूण ९८ लाख ३७ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या पथकाने केली कारवाई
ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक कुमार दराडे, पोलीस हवालदार जी. पी. मिसाळ, पोलीस नाईक एस. आर. क्षीरसागर आणि तपासी अंमलदार पोलीस नाईक व्ही. एम. बेळे यांच्या पथकाने केली. एका सामान्य चोरीच्या गुन्ह्यातून आंतरजिल्हा रॅकेट उध्वस्त केल्यामुळे धाराशिव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.






