नळदुर्ग: नळदुर्ग-अक्कलकोट रस्त्यावर झालेला ४ कोटींचा खर्च म्हणजे विकासाच्या नावाखाली दिवसाढवळ्या घातलेला दरोडाच आहे, हे आता स्पष्ट झाले आहे. रस्ता तयार करताना अंदाजपत्रकातील (Estimate) सर्व नियम पायळी तुडवून, ‘आहे त्या रस्त्यावरच’ अवघ्या अर्धा इंच खडीचा थर टाकून कंत्राटदाराने कोट्यवधी रुपये लाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या कंत्राटदारावर स्थानिक आमदारांचा ‘वरदहस्त’ असल्याने अधिकारी देखील या भ्रष्टाचाराकडे सोयीस्कर डोळेझाक करत आहेत.
अंदाजपत्रक कागदावरच, काम मात्र ‘जुगाड’ पद्धतीचे!


कोणताही पक्का रस्ता तयार करताना जुना रस्ता खोदून, त्यात दगड, खडी आणि मुरुम यांचे योग्य थरांचे सोलिंग (Soling) करून मगच डांबरीकरण करणे अपेक्षित असते. तसे स्पष्ट निर्देश अंदाजपत्रकात होते. मात्र, प्रत्यक्षात जागेवर वेगळेच चित्र आहे.
कंत्राटदाराने खोदकाम आणि खडीकरणाचा खर्च वाचवण्यासाठी ‘आहे त्या जुन्या रस्त्यावरच’ फक्त अर्धा इंच खडी अंथरली आणि त्यावर डांबराचा काळा रंग फासला. मुळात पायाच मजबूत नसल्याने, वरून कितीही डांबर ओतले तरी ते टिकणार नाही, हे माहित असूनही केवळ नफा कमावण्यासाठी हा जीवघेणा प्रकार करण्यात आला आहे.
साईड पट्ट्या गायब; अपघाताला निमंत्रण!
रस्ता डांबरीकरण करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईड पट्ट्या (Side Shoulders) भरणे तांत्रिकदृष्ट्या बंधनकारक असते. यामुळे वाहने रस्त्यावरून खाली उतरताना उलटत नाहीत आणि पावसाचे पाणी रस्त्यावर साचत नाही. मात्र, या रस्त्यावर साईड पट्ट्यांचे कामच करण्यात आलेले नाही. डांबरी रस्ता आणि बाजूची जमीन यात मोठा उंचवटा तयार झाल्याने दुचाकीस्वार तोल जाऊन पडत आहेत. कंत्राटदाराच्या या हलगर्जीपणामुळे हा रस्ता आता ‘अपघात क्षेत्र’ बनला आहे.
आमदारांच्या आशीर्वादाने कंत्राटदार शेफारला?
एवढ्या निकृष्ट दर्जाचे काम होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते गप्प का? असा सवाल उपस्थित होत आहे. याचे मूळ कारण म्हणजे कंत्राटदाराला असलेला स्थानिक आमदारांचा भक्कम ‘आशीर्वाद’. “साहेब पाठीशी आहेत, त्यामुळे कुणी काहीही करू शकत नाही,” अशा अविर्भावात कंत्राटदार काम करत असून, जनतेचा पैसा आणि जीव दोन्ही धोक्यात आले आहेत.
जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनीच कंत्राटदाराची पाठराखण केल्यावर दाद मागायची तरी कोणाकडे? असा उद्विग्न सवाल आता नळदुर्गमधील जनता करत आहे.








