धाराशिव: मंडळी, राजकारणात काय होईल आणि कोण कोणाच्या मांडीवर जाऊन बसेल, याचा काही नेम उरला नाहीये. पण धाराशिवमध्ये जे चाललंय, त्याला ‘राजकारण’ म्हणण्यापेक्षा ‘उसने-वारी’ किंवा ‘एक्सचेंज ऑफर’ म्हणणंच जास्त सोयीस्कर ठरेल!
धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत ‘महायुती’ झाली खरी, पण ही युती पाहून मतदारांना आणि खुद्द शिवसैनिकांना प्रश्न पडलाय की, “हे आपलं आहे की त्यांचं?”
🎭 नाटक: तिकीट कोणाचं?
धाराशिव आणि कळंब तालुक्यात गणिते मांडली गेली.
-
शिंदे गट: जिल्हा परिषदेला २ जागा, पंचायत समितीला २ जागा.
-
अजित दादा गट: १ जागा.
आता कागदावर हे वाटप भारी वाटतंय. पण गंमत बघा… जागा शिंदे गटाच्या, चिन्ह ‘धनुष्यबाण’, पण उमेदवार मात्र अस्सल ‘कमळ’ वाले! म्हणजे, दुकान शिवसेनेचं, पण आतमध्ये माल मात्र भाजपचा! यालाच म्हणतात आधुनिक ‘फ्रँचायझी’ मॉडेल!
🚚 संपर्कप्रमुख की कुरिअर बॉय?
या संपूर्ण नाटकाचे दिग्दर्शक आहेत भाजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, आणि यात ‘सपोर्टिंग रोल’ (किंवा व्हिलन?) निभावलाय शिवसेनेचे संपर्कप्रमुख राजन साळवी यांनी.
सध्या एक ऑडिओ क्लिप अशी व्हायरल झालीय की, जणू काय ती ‘नॅशनल सिक्रेट’च होती. या क्लिपमध्ये युवा पदाधिकारी अविनाश खापे यांनी साळवींची जी धुलाई केलीय (शाब्दिक हो!), ती ऐकून कोणालाही घाम फुटेल.
आरोप काय?
तर, शिवसेनेचे ‘एबी फॉर्म’ (जे अत्यंत गुप्त आणि महत्त्वाचे असतात) हे राजन साळवींनी थेट नेऊन दिले राणादादांच्या आणि त्यांचे सुपुत्र मल्हार पाटील यांच्या हातात!
म्हणजेच, “दिवसभर शिवसैनिकांसोबत ‘जय महाराष्ट्र’ करायचा आणि रात्री गुपचूप ‘जय श्रीराम’ म्हणत भाजपच्या बंगल्यावर फॉर्म पोहोचवायचे!”
आता बिचाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी काय करायचं? रांगेत उभं राहून तिकीट मागायचं कोणाकडे? आपल्या साहेबांकडे की शेजारच्या दादांकडे?
🔄 ‘पिंगळे’ पॅटर्न: इकडे आड, तिकडे विहीर!
यात अजून एक पात्र आहे—अजित पिंगळे. हे गृहस्थ राजकारणातल्या ‘फिरत्या रंगमंचा’सारखे आहेत.
-
आधी शिवसैनिक होते.
-
मग राणादादांसोबत भाजपमध्ये गेले.
-
परत विधानसभेला शिंदे गटात आले (पण पडले).
-
आणि आता? आता ते ‘मनाने’ राणादादांचे आणि ‘चिन्हाने’ शिंदेंचे आहेत!
खापे साहेबांच्या मते, पिंगळे हे राणादादांचे ‘ट्रोजन हॉर्स’ आहेत. म्हणजे ते शिवसेनेत राहून भाजपचं काम चोख बजावत आहेत. (काय ती निष्ठा… पण कोणावर?)
😭 शिवसैनिकांचा ‘आत्मक्लेश’
व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये एक वाक्य काळजाला घर पाडणारं आहे— “शिवसैनिक म्हणून ओळख सांगायला लाज वाटते!”
अहो, लाज वाटणारच ना! ज्या पक्षासाठी रक्ताचं पाणी केलं, त्या पक्षाची तिकीटं जर मित्रपक्षाच्या आमदाराच्या पोराच्या हातून वाटाली जात असतील, तर याला ‘महायुती’ म्हणायचं की ‘महा-गुलामगिरी’?
राजन साळवींनी तर क्लिपमध्ये कबुलीच दिलीय की, “हो, मी तिकिटं दिली तिकडे.” आता याला प्रांजळपणा म्हणायचं की हतबलता, हे त्या साळवींनाच ठाऊक!
🏁 निष्कर्ष: ‘बाण’ सुटला, पण निशाणा चुकला?
थोडक्यात काय, तर धाराशिवमध्ये *‘शिंदे सेने’ची अवस्था अशी झालीय की, “नाव आमचं, गाव तुमचं आणि कारभार राणादांचा!”
ज्या वेगाने भाजपचे लोक सेनेच्या तिकीटावर उभे राहत आहेत, ते पाहता उद्या असं होऊ नये की, शिवसैनिकांना पक्षप्रवेश करण्यासाठी भाजपच्या कार्यालयातून फॉर्म आणावा लागेल!
ब्रेकिंग न्यूज: धाराशिवमध्ये आता निष्ठावंत शिवसैनिकांसाठी नवीन योजना— “तुम्ही फक्त सतरंजी उचला, उमेदवार आम्ही बाहेरून आणतो!”
(टीप: हा लेख केवळ राजकीय परिस्थितीवर आधारित विनोदी भाष्य आहे. कृपया कुणीही मनावर घेऊ नये, आणि घेतलंच तर… ‘राणादादां’कडे तक्रार करावी, कारण फॉर्म तिथेच मिळतात! 😉)
-बोरूबहाद्दर






