धाराशिव: राजकारणात असं म्हणतात की, “जेव्हा तुमचा शत्रू चूक करत असतो (किंवा आपसात भांडत असतो), तेव्हा त्याला अजिबात डिस्टर्ब करू नये!” धाराशिवचे ‘फायरब्रँड’ खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नेमकं हेच सूत्र सध्या अंमलात आणल्याचं दिसतंय.
नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजप आणि शिंदे गटाने बाजी मारली, ‘मशाल’ थोडी विझली, पण त्यानंतर जी शांतता पसरली आहे, ती एखाद्या वादळापूर्वीची आहे की रणनीतीचा भाग? यावर सध्या कट्ट्यावरच्या चर्चांना उधाण आलंय.
🎤 पत्रकारांचे हाल: “अहो, बाईट द्या ना दादा !”
एरव्ही माईक समोर आला की, ज्यांची तोफ धडाधड चालते, ते ओमराजे सध्या पत्रकारांना चकवा देत आहेत.
टीव्ही चॅनेलचे प्रतिनिधी सकाळपासून बूम (Boom) घेऊन फिरतायत, “दादा , काहीतरी बोला, सरकारवर टीका करा, राणा पाटलांना दोन शब्द सुनाव…” पण ओमराजे फक्त हसून “नियोजन सुरू आहे,” एवढंच सांगून निघून जात आहेत.
त्यामुळे पत्रकारांची अवस्था “पोटात भूक आणि ताटात काहीच नाही” अशी झालीय.
-
ओमराजे बोलले नाहीत तर ब्रेकिंग न्यूज कशी बनणार?
-
आणि न्यूज नाही तर टीआरपी कसा मिळणार?
सध्या न्यूज चॅनेलच्या ऑफिसमध्ये “ओमराजे अजून गप्प कसे?” यावरच संशोधन सुरू आहे.
🤔 ‘इतना सन्नाटा क्यूं है भाई?’
सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे पण ओमराजे निंबाळकर शांत आहेत. या शांततेमागे एक ‘मास्टरस्ट्रोक’ असल्याचं बोललं जातंय.
ओमराजे हे जाणतात की, जर ते बोलले तर समोरून भाजपचे पदाधिकारी (आणि राणा पाटील गट) त्यांना प्रत्युत्तर देणार. मग आरोप-प्रत्यारोपांचा सामना रंगणार.
पण ओमराजे जर गप्प बसले, तर भाजपवाले भांडणार कोणाशी? भिंतीशी?
त्यामुळे सध्या विरोधकांना ‘इग्नोर’ करून कन्फ्युज करण्याची ही नवीन ‘ओमराजे नीती’ आहे.
🔥 दुसरीकडे वणवा: ‘महायुती’ की ‘महा-कुस्ती’?
मज्जा बघा, इकडे विरोधक शांत आहेत, पण सत्ताधारीच एकमेकांचे कपडे फाडायला टपलेत!
शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप (राणा पाटील गट) यांच्यात सध्या “हम आपके है कौन?” असा खेळ सुरू आहे.
कळंब, भूम, परंड्यात नगराध्यक्ष शिंदे गटाचे, पण नगरसेवक भाजपचे! म्हणजे “डोक्यावर मुकुट एकाचा, पण खाली सैन्य दुसऱ्याचं!” अशी विचित्र परिस्थिती.
त्यात भरीस भर म्हणून भाजप आमदार राणा पाटील यांच्या पत्नी, सौ. अर्चना पाटील यांचं तिकीट कापल्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण तापलंय.
🍿 ओमराजेंची ‘पॉपकॉर्न’ डिप्लोमसी
आता चित्र कसं दिसतंय पहा:
१. शिंदे गट आणि भाजपवाले एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढण्यात बिजी आहेत.
२. अर्चना पाटलांच्या तिकीट कटिंगमुळे भाजपच्या गोटात धुसफूस आहे.
३. आणि ओमराजे? ते कोपऱ्यात बसून निवांत ‘पॉपकॉर्न’ खात हा तमाशा बघत आहेत!
त्यांना माहितीय, “जे काम आपली जीभ झिजवून होणार नाही, ते काम विरोधकांच्या अंतर्गत भांडणाने आपोआप होणार आहे.”
पत्रकार बांधवांनो, सध्या तरी तुम्हाला ‘आग’ लावायला काडीपेटी मिळणार नाही, कारण ओमराजेंनी ती लपवून ठेवलीय आणि बाकीचे स्वतःच्याच घराला आगी लावून घेण्यात मग्न आहेत!
– बोरूबहाद्दर






