धाराशिव: धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत तिकीट वाटपावरून महायुतीमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) वाट्याची उमेदवारी चक्क भाजपच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचा आरोप करत शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. या संतापाचा उद्रेक होऊन आज पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि संपर्कप्रमुख राजन साळवी यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे. मात्र, काही ठिकाणी निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटाची उमेदवारी देण्यात आल्याने स्थानिक कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत. याच मुद्द्यावरून आज वातावरण चांगलेच तापले.
सुधीर अण्णा पाटील यांच्या घरी गोंधळ
शिवसेनेचे नेते सुधीर अण्णा पाटील यांच्या निवासस्थानी शेकडो संतप्त कार्यकर्ते जमले होते. यावेळी संपर्कप्रमुख राजन साळवी आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक तिथे पोहोचताच शिवसैनिकांनी त्यांना घेराव घातला. तिकीट वाटपाबाबत जाब विचारत कार्यकर्त्यांनी पालकमंत्र्यांसमोरच जोरदार घोषणाबाजी आणि गोंधळ घातला.
कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
वातावरण इतके तणावपूर्ण झाले की, उपस्थित कार्यकर्त्यांमध्येच तू-तू मै-मै सुरू झाली. याचे रूपांतर पुढे शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. शिंदे गटाचे कार्यकर्ते आपापसात भिडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर उफाळून आलेल्या या अंतर्गत कलहाचा फटका शिंदे गटाला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ठळक मुद्दे:
-
शिंदे गटाची तिकीटे भाजप कार्यकर्त्यांना दिल्याने वाद.
-
पालकमंत्री प्रताप सरनाईक व राजन साळवी यांना घेराव.
-
सुधीर अण्णा पाटील यांच्या घरी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी.
-
कार्यकर्त्यांमध्ये शिवीगाळ आणि हाणामारी, पोलिसांचा हस्तक्षेप.






