तुळजापूर: किरकोळ कारणावरून सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून एका १९ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा (तुळ) येथे घडली आहे. याप्रकरणी पती, सासू-सासऱ्यांसह सहा जणांवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुस्कान उर्फ पायल सुशील भालेराव (वय १९, रा. देवसिंगा, ता. तुळजापूर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मुस्कान यांचा विवाह सुशील हनुमंत भालेराव याच्याशी झाला होता. लग्नानंतर सासरी नांदत असताना आरोपींनी मुस्कान यांना वारंवार किरकोळ कारणावरून शिवीगाळ करणे, लाथाबुक्यांनी मारहाण करणे तसेच शारीरिक व मानसिक त्रास देणे सुरू केले. या सततच्या जाचाला आणि त्रासाला कंटाळून मुस्कान यांनी २१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.
सहा जणांवर गुन्हा दाखल
या दुर्दैवी घटनेनंतर मयत विवाहितेचे नातेवाईक रहेमान मोहम्मद शेख (वय ३१, रा. जयभवानी चौक, ईस्लामपुरा, धारुर, जि. बीड) यांनी तुळजापूर पोलिसांत धाव घेतली. त्यांनी २४ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी खालील आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे:
१. पती – सुशील हनुमंत भालेराव २. सासरे – हनुमंत भालेराव ३. सासू – जयश्री भालेराव ४. दीर – स्वप्नील हनुमंत भालेराव ५. जाऊ – पंचशीला स्वप्नील भालेराव ६. नणंद – मयुरी हनुमंत भालेराव (सर्व रा. देवसिंगा तुळ, ता. तुळजापूर, जि. धाराशिव)
सदर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे) आणि ३(५) (समान उद्देश) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजापूर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.






