वाशी: शेतातून जाण्यासाठी रस्ता मागितल्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून दोघांनी एका ३९ वर्षीय इसमाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना वाशी तालुक्यातील गिरवली शिवारात घडली आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात दोघांवर खुनाचा प्रयत्न (Attempt to Murder) केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देवराव दत्तु मोटे (वय ३९, रा. गिरवली, ता. भूम) हे दिनांक २४ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गिरवली शिवारातील पिंपळगाव पाटी ते गिरवली गावाकडे जाणाऱ्या शेतरस्त्यावर (मीनाक्षी बाबुराव मोटे यांच्या शेताजवळ) होते.
यावेळी आरोपी स्वप्नील बाळु जानराव आणि नाना माने (दोघे रा. भूम) तेथे आले. त्यांनी देवराव मोटे यांच्याकडे जाण्यासाठी रस्ता मागितला. यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. आरोपींनी ‘जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने’ देवराव मोटे यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढवला आणि त्यांना गंभीर जखमी केले.
जखमी देवराव मोटे यांनी त्याच दिवशी (२४ जानेवारी) वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी स्वप्नील जानराव आणि नाना माने यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९(१) (खुनाचा प्रयत्न), ११८(१) (घातक शस्त्राने दुखापत करणे), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपमान करणे) आणि ३(५) (समान उद्देश) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. वाशी पोलीस अधिक तपास करत आहेत.
बांधावरील झाड आणि पाण्याच्या कारणावरून वाद पेटला; रागाच्या भरात बोअरवेलची वायर आणि पाईप जाळले, बावीत दोघांवर गुन्हा
भूम: शेताच्या बांधावर असलेल्या बोराच्या झाडावरून आणि पाणी मागण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्याचे मोठे नुकसान केल्याचा प्रकार भूम तालुक्यातील बावी येथे घडला आहे. आरोपींनी फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत बोअरवेलची वायर आणि पाईप जाळले, यात शेतकऱ्याचे १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लहु तुकाराम कांबळे (वय ४०, रा. बावी, ता. भूम) यांची बावी शिवारात गट नं. ९२ मध्ये शेतजमीन आहे. २४ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपूर्वी त्यांच्याच गावात राहणारे आरोपी अंकुश बाबा कांबळे आणि हरी अंकुश कांबळे यांच्याशी त्यांचा वाद झाला.
हा वाद शेताच्या बांधावरील बोराचे झाड आणि बोअरवेलचे पाणी मागण्याच्या कारणावरून झाला. यावेळी आरोपींनी लहु कांबळे यांना शिवीगाळ करत “तुला जीवे मारून टाकू,” अशी धमकी दिली. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी लहु कांबळे यांच्या बोअरवेलची वायर आणि पाईप जाळून टाकले. या जाळपोळीत फिर्यादीचे सुमारे १ लाख २० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याप्रकरणी लहु कांबळे यांनी २४ जानेवारी रोजी भूम पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी अंकुश कांबळे आणि हरी कांबळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३२६ (फ) (आगीने किंवा स्फोटक पदार्थाने नुकसान करणे), ३५२ (शांतता भंग करणे), ३५१ (३) (गुन्हेगारी धमकी) आणि ३ (५) (समान उद्देश) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.






