धाराशिव: मित्राला दारू आणि पाणी आणण्यासाठी बळजबरी करणाऱ्या टोळक्याला रोखणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. याचा राग मनात धरून तीन आरोपींनी संबंधित तरुणावर लोखंडी कोयता आणि दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना धाराशिवमध्ये घडली आहे. याप्रकरणी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.०० ते ११.१५ च्या सुमारास धाराशिव येथील मच्छी मार्केट परिसरात घडली. फिर्यादी अझहर मुक्तार सय्यद (वय ३८, रा. धारासूर मर्दिनी कमान, इंगळे गल्ली, अक्सा चौक, खॉजानगर, धाराशिव) हे आपल्या मित्राला घेऊन जाण्यासाठी आले होते.
त्यावेळी आरोपींनी फिर्यादीच्या मित्राला दारू व पाणी घेऊन ये, असे म्हणत बळजबरी करत होते. अझहर सय्यद यांनी याला विरोध करत आपल्या मित्राला तेथून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. याचाच राग मनात धरून आरोपींनी अझहर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
कोयता आणि दगडाने हल्ला
वाद विकोपाला गेल्यावर आरोपींनी अझहर सय्यद यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लोखंडी कोयता आणि दगडाने जबर मारहाण केली. या हल्ल्यात अझहर सय्यद हे गंभीर जखमी झाले आहेत.
आरोपींची नावे:
१. शहबाज खादर तांबोळी उर्फ चाँद (रा. झोरी गल्ली, धाराशिव)
२. यासीन अलबक्श तांबोळी उर्फ येश्या (रा. सांजा रोड, धाराशिव)
३. मेहराज मुजीब सय्यद उर्फ सोन्या (रा. सांजा रोड, धाराशिव)
पोलीस कारवाई
गंभीर जखमी झालेल्या अझहर सय्यद यांनी दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०९ (जीवे मारण्याचा प्रयत्न), १२५, ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) आणि आर्म ॲक्ट कलम ४, २५ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.





