तुळजापूर: तालुक्यातील कदमवाडी येथे एका घरगुती कार्यक्रमातील जेवणातून तब्बल ३१ जणांना अन्नातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. ८) घडली. बाधितांमध्ये लहान मुले आणि ज्येष्ठांचा मोठ्या प्रमाणावर समावेश असून, सर्वांना उपचारासाठी तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कदमवाडी येथे सुवासिनींच्या जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हे जेवण केल्यानंतर काही वेळातच उपस्थितांना मळमळणे, उलट्या, जुलाब आणि तीव्र तापाचा त्रास सुरू झाला. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना त्रास होऊ लागल्याने गावात एकच खळबळ उडाली. गावकऱ्यांनी प्रसंगावधान राखत खासगी वाहनांद्वारे सर्व रुग्णांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात हलवले.


रुग्णालयातील नोंदीनुसार एकूण ३१ जणांना विषबाधा झाली आहे. यामध्ये खालील प्रमुख नावांचा समावेश आहे:
-
ज्येष्ठ नागरिक: सौदागर शिवराम मिसाळ (७८), आंबूबाई मिसाळ (६०), हनुमंत मिसाळ (४०), साखराबाई लवटे (४०), गणपत पवार (७०), तुकाई शिंदे (६२) इत्यादी.
-
लहान मुले: प्राप्ती पवार (०३ वर्षे), श्रद्धा पवार (०६ वर्षे).
-
इतर: अश्विनी गुंड (३१), करण गायकवाड (१६), निकिता पवार (२०), स्नेहा कदम (२७), मंदाकिनी कदम (५०) यांसह इतर ग्रामस्थ.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व रुग्णांची प्रकृती सध्या स्थिर असून कोणालाही गंभीर धोका नाही.
घटनेची माहिती मिळताच तुळजापूर पंचायत समितीचे नूतन सभापती विक्रमसिंह देशमुख आणि सदस्य किसन देडे यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी रुग्णांच्या तब्येतीची विचारपूस करून डॉक्टरांना योग्य त्या सूचना दिल्या व रुग्णांच्या नातेवाईकांना धीर दिला.
उन्हाळ्याच्या दिवसांत अन्नातून विषबाधा होण्याच्या घटना वाढत असल्याने अन्न व औषध प्रशासनावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून, कार्यक्रमातील जेवणाचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास स्थानिक पोलीस आणि आरोग्य विभाग करत आहे.





